Manorama Khedkar Arrested: राज्यभरातच चर्चेत असलेले पूजा खेडकर (Puja Khedkar) आणि कुटुबांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.  मुळशी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरवर (Manorama Khedkar) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांची काही पथकं मनोरमा खेडकरसह इतर 7 जणांचा शोध घेत होती. काल(गुरूवारी) पूजाची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिला कोर्टात हजर केलं. त्यानंतर तिला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता बंदुकीचा धाक दाखवलेलं पासलकर कुटुंब घाबरलं आहे. 
 
मनोरमा खेडकरने (Manorama Khedkar) ज्या शेतकरी कुटुंबाला धमकावलं होतं त्या कुलदीप पासलकरांशी एबीपी माझाने संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली आहे. खेडकरांनी आम्हाला या आधी देखील खूप त्रास दिला आहे. ते बॉडीगार्ड घेऊन हाता पिस्तुल घेऊन आले होते. ते पोलिसांशी, माध्यमांशी असे वागत आहेत, त्यांना दाद देत नाहीत तर ते सामान्यांशी कसे वागत असतील त्यांची कल्पना करा. या प्रकरणात सखोल चौकशी करून योग्य तो गुन्हा दाखल करावा. आम्हाला त्या लोकांपासून धोका आहे. ते पुढे देखील आम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. 


मनोरमा खेडकर डॉटेलमध्ये नाव बदलून राहत होती


पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar)  अखेर काल (गुरुवारी) सकाळी महाड येथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेसह पौड पोलिसांनी ही कारवाई केली. मनोरमा हिला पौड पोलिस ठाण्यात आणून अटक केली. पिस्तूल रोखून एका शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप मनोरमावर होता. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यामध्ये खेडकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाली होती. मनोरमा खेडकर ज्या होम स्टे (हॉटेल) मधून तिला पकडण्यात आले, तेथे नाव बदलून ती राहत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे


हिरकणवाडी (महाड) येथील पार्वती निवास होम स्टे येथे मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) इंदूबाई ढाकणे नावाने राहत असल्याची माहिती समोर आली आहे. सोबत असलेल्या कॅब चालकाला तिने मुलगा असल्याचे सांगितलं असल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती भाड्याने कॅब घेऊन फिरत होती, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. बुधवारी (दि. १७) संध्याकाळी पाऊस सुरू असताना मनोरमा हिरकणवाडी येथील हॉटेलमध्ये राहण्यासाठी आली. या वेळी तिने मोबाइलद्वारे इंदूबाई ढाकणे नावाचे आधार कार्ड दाखवत हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. या प्रकरणी पोलिसांकडून मनोरमाच्या नवऱ्याचा दिलीप खेडकर याचा देखील शोध सुरू असून, लवकरच त्यालादेखील अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.


VIDEO: मनोरमा खेडकरला अटक पण आमच्या जीवाला धोका...