Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 21 Nov 2021 09:14 AM
महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुण्यातील कोंढवा परिसरातून आज सायंकाळी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रवी कचरू नागदिवे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. मयत रवी हा उरळीकांचन येथून कोंढवा परिसरात एका महिलेला भेटण्यासाठी रिक्षा करून आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी रवी आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि जखमी दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग - किरीट सोमैया

उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं. कारण सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्यांनी तुरुंगाच्या भाषेवर अक्षरशः यु टर्न घेतला आहे. प्रत्येकवेळी तुम्ही अजित पवार तुरुंगात जाणार असं म्हणता पण प्रत्यक्षात तसं घडतच नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमैय्यांना विचारण्यात आला. तेंव्हा तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पहा. असं म्हणत तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा. असं उलट आवाहन सोमैयांनी केलं. पण हे करताना अजित पवार तुरुंगात जाणार नाहीत हे सोमैयांनी यावेळी जणू स्पष्ट केलं. 

धक्कादायक! पुण्यात तरुणाने 16 वर्षीय मित्रावर केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक

पुण्यात एका तरुणाने 16 वर्षीय मित्रावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलीये. तळजाई पठार येथे राहणारा पीडित अल्पवयीन दांडेकर पूल येथील सागर सोनवणे नामक मित्राच्या घरी आला होता. तिथंच ओळखीचा फायदा घेऊन सोनवणेने त्या पीडित मुलाला स्वच्छतागृहात नेहलं आणि मारहाण करून केली नंतर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार ही केले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक ही केलीये.

पार्श्वभूमी

Pune : पुणे महापालिकेचे एक कोटी रुपयांचे बोगस बिल, न झालेल्या कामाचे बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण 


महापालिकेच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे अजून एक उदाहरण समोर आलंय. अनेक नवनवे घोटाळे करण्यासाठी ओळखली जाणारी पुणे महापालिका आता चक्क न केलेल्या कामांसाठी एक कोटी रुपये वाटायला निघाली होती. आरोग्य विभागाच्या एका न झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचे बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.  नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण एक कोटींच्या रक्कमेचे बिल अदा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन बिल अदा करण्यात यावे असा शेरा विभागाकडून देण्यात आलेला होता. मात्र ज्या आरोग्य विभागाचे हे काम होतं त्यांना याची कुठलीच कल्पना नव्हती. जेव्हा या कामांची विचारणा त्यांच्याकडे झाली तेव्हा असं कुठलंही कंत्राट दिलेलेच नसल्याचा खुलासा झाला अन् आता प्रकरणी पुणे महापालिकेने ठेकेदाराविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस त्याचा तपास करत आहेत.


पुण्यात सलीम अली पक्षी अभयारण्य धोक्यात


पुणे शहाराच्या मधोमध मुठा नदीच्या काठावर असलेले सलीम अली पक्षी अभयारण्य इथं आढळणाऱ्या देशी - विदेशी पक्षांसाठी ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने होणारी अतिक्रमणं आणि महापालिकेकडून त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं पुण्याचं फुफ्फुस म्हणवणारं हे अभयारण्य धोक्यात आलं आहे.  पुणे शहराच्या अगदी मधोमध  घनदाट जंगल टिकून असून पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. मुठा नदीच्या काठावरील  22 एकरांच्या या हिरव्या पट्ट्यात शेकाट्या, तांबट, नदी सुरय, राखी बगळा, कोतवाल, सातभाई, पारवा, पोपट लालबुड्या बुलबुल, पोपट असे देशी आणि युरेशियन स्पुनबिल, कॉमन तिल , नॉर्दर्न पाइंन्टेल , गर्गनेई असे अनेक विदेशी पक्षी आढळतात . शिवाय शेजारच्या मुठा नदीतही हळदी - कुंकू, टिबुकली, गायबगळा, खंड्या, धोबी, टिटवी  अशा पाणथळ भागात राहणाऱ्या पक्षांचा किलबिलाट सुरु असतो . मात्र आता हे सगळं धोक्यात आले आहे. कारण दररोज इथं ट्रक भरभरून राडा रोडा टाकला जात आहे. त्यामुळं मुठा नदीचं पात्र येथे तब्ब्ल वीस ते बावीस फूट उंच उचललं गेलंय. त्याचा परिणाम या नदीकाठावर आढळणाऱ्या झाडांवर आणि पक्षांवर तर होत आहे. शिवाय पावसाळ्यात पुराचा धोकाही त्यामुळं निर्माण झालय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.