सिंधुदुर्ग : कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.


चाकरमान्यांची पावलं गावाकडे वळणार


महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.


आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 22 फेब्रुवारीला


आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा येत्या 22 फेब्रुवारीला
होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.


नवसाला पावणारी भराडी देवी


मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं सर्वांसाठी दर्शन खुले असते. भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.


दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी


दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.


देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरवण्यात येतो


सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात येते. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


हेही वाचा:


Kumbh Mela 2027 : गोदावरीत स्नानासाठी बंदी? आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी; गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत