मुंबई : राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर (Ladki bahin yojana) जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजना आमच्यासाठी गेमचेंजर ठरली असून लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरुन मतदान केल्याचं महायुतीचे प्रमुख नेते सांगत आहेत. दुसरीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात असून लाडकी बहीण योजनेच्या निषकांमध्ये आता बदल केला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचं, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेजही फिरत आहेत. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता, याबाबत स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती देत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन राज्यातील लाडक्या बहिणींना केलं आहे. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारीत करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये, असे विनंतीपूर्वक आवाहनही आदिती तटकरे यांनी केले आहे.  त्यामुळे, संभ्रमात असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला, असून सध्यातरी कुठल्याही निकषात बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झालं आहे.






नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया


दरम्यान, ज्या मुस्लिम कुटुंबात तीन अपत्य आहेत अशा मुस्लिम महिलांची लाडकी बहीण योजना रद्द केली पाहिजे या नितेश राणेंच्या वक्तव्यावर आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशामध्ये कायदा एकदम सुस्पष्ट आहे. कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. हिंदू कायदा वेगळा आहे, मुस्लिम कायदा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत बसूनच सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असं स्पष्ट मत आमदार तांबे यांनी व्यक्त केलं आहे.


हेही वाचा


परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर