पुणे: पुण्यातील एका नामांकित बर्गर शॉप आणि बर्गर किंगच्या नावावरून आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यापूर्वी पुण्यातील कनिष्ठ न्यायालयाने पुण्यातील (Pune News) रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायालयाने सांगितले की, 6 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी होईपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंट 'बर्गर किंग' (Burger King) नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.


आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन 'बर्गर किंग' (Burger King) यांनी पुण्यातील न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. यामध्ये पुण्यातील स्थानिक इराणी दाम्पत्याच्या रेस्टॉरंटला 'बर्गर किंग' हे नाव वापरून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रदीर्घ लढाईनंतर पुणे न्यायालयाने या दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला होता. त्या निर्णयाविरोधात बर्गर किंगने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांची सुनावणी आता 6 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. तोपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंट 'बर्गर किंग' (Burger King)नाव वापरण्यास बंदी घातली आहे.


पुण्यात रेस्टॉरंट चालवतात इराणी दाम्पत्य


हा लढा आजचा नाही, हा ट्रेडमार्कचा लढा 2011 पासून सुरू आहे. अमेरिकेच्या बर्गर किंग (Burger King) कॉर्पोरेशनने 2011 मध्ये या नावाबाबत खटला दाखल केला होता. मात्र, पुण्यातील एक बर्गर जॉईंट याच नावाचा वापर करत असल्याचे आढळून आले. हे रेस्टॉरंट इराणी दाम्पत्य चालवत आहे. बर्गर किंगने हे नाव वापरण्याबाबत युक्तीवाद करताना असे करणे त्याच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे आणि नावाचा वापर थांबवण्यासाठी आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोर्टात धाव घेतली होती.


काय म्हणाले इराणी दाम्पत्य?


पुण्यात दुकान चालवणाऱ्या इराणी दाम्पत्याने न्यायालयात सांगितले की, अमेरिकन बर्गर किंग (Burger King) भारतात येण्याच्या खूप आधीपासून ते 1992 पासून 'बर्गर किंग' हे नाव वापरत आहेत. कोणाचीही दिशाभूल करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यावेळी बर्गर किंगला (Burger King) भारतात फारशी मान्यता नव्हती. इराणी दाम्पत्याने कंपनीकडे 20 लाख रुपयांची भरपाईही मागितली होती. त्यांचा दावा आहे की बर्गर किंगच्या कायदेशीर कृतींमुळे त्यांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे.


वाद कसा सुरू झाला?


जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या फास्ट फूड बर्गर कंपन्यांपैकी एक असलेल्या बर्गर किंगने 1954 मध्ये ट्रेडमार्क वापरण्यास सुरुवात केली होती. 1982 मध्ये त्याचे आशियातील पहिले फ्रेंचाइज्ड रेस्टॉरंट होते आणि सध्या आशियामध्ये 1200 हून अधिक रेस्टॉरंट आहेत. कंपनीचे पहिले रेस्टॉरंट 9 नोव्हेंबर 2014 रोजी नवी दिल्ली येथे उघडले गेले आणि त्यानंतर आणखी काही आऊटलेट्स भारतात उघडले गेले आहेत, त्यापैकी एक एप्रिल 2015 मध्ये पुण्यात उघडण्यात आले.


 2008 मध्ये अमेरिकन कंपनीला समजले की, अनाहिता आणि शापूर इराणी यांच्या मालकीच्या पुणेस्थित रेस्टॉरंटने ‘बर्गर किंग’ या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता. 2009 मध्ये अमेरिकन कंपनीने पुण्यातील कॅम्प आणि कोरेगाव पार्क येथील रेस्टॉरंट मालकांना नोटीस पाठवली होती, परंतु त्यांनी त्यास विरोध केला आणि अमेरिकन कंपन्यांचे कायदेशीर अधिकार नाकारले. त्यांनी आपल्या रेस्टॉरंटसाठी बर्गर किंग हे नाव वापरण्याचा आग्रह धरला आणि सांगितले की कंपनीची रेस्टॉरंट्स भारतात अस्तित्वात नाहीत आणि म्हणून ते कोणत्याही सामान्य कायदेशीर अधिकारांचा दावा करू शकत नाहीत.


कोर्टात कसं पोहोचलं प्रकरण?


2011 मध्ये, यूएस-आधारित कंपनीने इराणी जोडप्याला पुणे न्यायालयात आव्हान दिलं, जिथे या खटल्याच्या समर्थनार्थ साक्षीदार सादर करून खटला चालवला गेला. इराणी दाम्पत्याने असा आरोप केला आहे की, बर्गर किंग ट्रेडमार्कची नोंदणी उत्पादनांसाठी 1979 मध्ये आणि मे 2000 मध्ये सँडविच, बर्गर इत्यादींसाठी करण्यात आली होती. म्हणून, ज्या श्रेणींमध्ये वस्तूंची नोंदणी केली जाते त्या भिन्न आहेत. त्याचवेळी त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करत 20 लाख रुपयांची भरपाई मागितली होती.


खटल्यातील न्यायमूर्तींनी 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात, यूएस दिग्गजांचे युक्तिवाद नाकारले आणि सांगितले की पुण्यातील 'बर्गर किंग' हे अमेरिकन बर्गर जॉइंटने भारतात दुकान उघडण्यापूर्वीच कार्यरत होते आणि नंतर ते सिद्ध करण्यात अयशस्वी झाले पुण्यातील रेस्टॉरंटने त्याच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन केले. त्यानंतर आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. त्यानंतर आगामी सुनावणी पार पडेपर्यंत हे नाव वापरण्यास पुण्यातील रेस्टॉरंटला बंदी घालण्यात आली आहे.