Pune News : खासगी सावकारांकडून घेतलेलं तेरा लाखांचं कर्ज फेडता न आल्यानं, सावकारांनी जाच केला. अन अखेर याला कंटाळून पिंपरी चिंचवडमध्ये एका कुटुंबाने आत्महत्या केलीये. पत्नी शीतल हांडेने मुंबईत राहणाऱ्या भावाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं कळवलं. मग तातडीनं दहा वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली अन नंतर हांडे दाम्पत्याने गळफास घेतला. मात्र पोलीस वेळीच घरी पोहचल्यानं पती मात्र बचावला आहे. परंतु पती वैभव हांडे वर पोटच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सावकार संतोष कदम, संतोष पवार आणि जावेद शेख या तिघांना चिखली पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. चौथ्याचा शोध सुरु आहे. 


अधिकची माहिती अशी की, वैभव हांडे आणि शीतल हांडे हे दाम्पत्य औषध विक्रीचं (मेडिकल) दुकान चालवत होते. आधी एक अन कालांतराने दुसरं मेडिकल टाकलं. यासाठी 2017 मध्ये खासगी सावकारांकडून पहिलं कर्ज घेतलं अन इथून हांडे कुटुंबियांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली. एक कर्ज फेडण्यासाठी, दुसरं कर्ज, मग दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेण्याच्या नादात हांडे दाम्पत्य कर्जाच्या फेऱ्यात अडकले. बऱ्यापैकी त्यांनी कर्ज फेडलं ही मात्र अलीकडच्या काळात साडे तेरा लाखांचं कर्ज उरलं होतं. यासाठी चार सावकारांनी हांडे दाम्पत्यांकडे तगादा लावला होता. मात्र हा तगादा हांडे दाम्पत्याना सहन झाला नाही. अखेर शुक्रवारच्या सायंकाळी या पत्नी शीतल यांनी मुंबईत राहणाऱ्या भावाला आम्ही आत्महत्या करत असल्याचं कळवलं अन फोन स्विच ऑफ केला. मग पती-पत्नी आणि मुलाने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, त्यानंतर पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून करण्यात आला. मुलगा मृत पावलाय का? याची शहानिशा करुन या दोघांनी गळफास घेतला.


दरम्यानच्या काळात शीतल यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्यानं, भावाने थेट पोलिसांना याबाबत कळवलं. चिखली पोलिसांनी हांडे दाम्पत्याचं घर गाठलं, तेव्हा शीतल या मृतावस्थेत होत्या तर वैभव यांचा श्वास सुरु होता. हे पाहून पोलिसांनी वैभव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळं वैभव यातून बचावले, मात्र ते शुद्धीवर आल्यानंतर घडली हकीकत त्यांनी पोलिसांना सांगितली. तेंव्हा मुलाचा खून केल्याप्रकरणी वैभव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे सावकारांच्या ही मुसक्या आळवण्यात आल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Guardian Ministers List : तीन नेत्यांकडे सहा जिल्हे, कोल्हापूर अन् मुंबईसाठी दोन -दोन कारभारी, कलह टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक