Pune News : पुण्यातील हडपसर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरत होती. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली असून अनिता दिलीप खाटपे (वय 45) या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. याचाच राग मनात भरून ही महिला सोसायटीतील एकच कुत्रा जिवंत ठेवणार नाही असे म्हणुन हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती. संतापात असलेल्या या महिलेने दोन पिलांना बदडून ठार देखील मारलं. त्यानंतरही दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न ही महिला करत होती. हातात काठी घेऊन फिरत असताना ही महिला अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. कुत्र्याला का मारता अशी विचारणा केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत अरेरावी केल्याचही एका व्हिडिओत कैद झाले आहे.
दरम्यान, कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना या महिलेने मारण्याचं लक्षात आल्यानंतर सोसायटीतच राहणाऱ्या अन्य एका महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे श्वान प्रेमी संतापले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: