MNS Leader Vasant More Career : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणाच्या चर्चा रंगल्या. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर मशिदींवरील भोंग्यावर साधलेला निशाणा यांमुळे राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं. पण यानंतर पक्षातही अंतर्गत कलह सुरु झाला. अनेक मुस्लिम नेत्यांनी राजीनामे दिले. आणि मनसे नेते राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. यासर्वात एक नाव पुढे आलं ते म्हणजे, वसंत कृष्ण मोरे. मनसेची पुण्यातील ओळख म्हणजे, वसंत मोरे. पण हे नेमके कोण? आणि त्यांच्या चर्चेत येण्याची कारणं काय? हे जाणून घेऊयात... 


वसंत कृष्ण मोरे, म्हणजे राज ठाकरेंचे विश्वासू मनसैनिक. वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत, ते राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमुळे. त्या सभेत राज यांनी मुस्लिम समाजाच्या मशिदींवरील भोंग्यांना टार्गेट केलं आणि भोंग्यांविरुद्ध हनुमान चालीसा असं युद्धच सुरू झालं. याला अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला तर काहींनी विरोध केला. त्या विरोधकांच्या यादीत होतं एक मोठं नाव आणि ते नाव म्हणजे, वसंत मोरे. पण हे वसंत मोरे नेमके आहेत तरी कोण? 


वसंत कृष्ण मोरे कोण? 


कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख. राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेंचं नाव अग्रस्थानी येतं. वसंत मोरे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1975 साली पुण्यात झाला. कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शाहू मंदिरमध्ये महाविद्यालयीनं शिक्षण पूर्ण केलं. वसंत मोरेंच्या व्यावसायाबाबत बोलायचं झालं तर ते एक व्यावसायिक असून शेतकरीही आहेत. 


वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते राज ठाकरेंप्रमाणेच आधीचे शिवसैनिक आहेत. गेली 27 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. वर्षभरातच म्हणजेच, 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं एकाच फटक्यात 8 नगरसेवक निवडून आणले. मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता. मोरेंनी यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. 


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray यांचा आदेश झेलणारा मनसैनिक, कोण आहेत वसंत मोरे?



2012च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेनं थेट 27 नगरसेवक निवडून आणले आणि वसंत मोरेदेखील पुन्हा जिंकले. दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. पण तिथं मात्र यश त्यांच्या हाती लागलं नाही. ते पुन्हा 2017 साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. इतकंच नाही तर 2012 ते 2013 दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपद देखील भूषवलं. 


राज ठाकरेंचा करिष्मा होताच, पण वसंत मोरे यांची ओळख म्हणजे, ते स्वतःच्या जीवावर निवडणून येणारे नेते. त्यांनी राज आदेश कधीच मोडला नाही, मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतोच. तर कोरोना काळात वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक सर्वांनीच केलं. समोरच्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. कधी गाडीला लावलेला जॅमर तोडायचे, तर कधी थेट अधिकाऱ्यांची गाडीचं फोडायची. जनतेची केलेली सेवा ते व्हिडीओमार्फत सोशल मीडियावर टाकायचे आणि त्यातूनच वसंत मोरे हे नाव फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचलं. 


फेब्रुवारी 2021 दरम्यान त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. कृष्णकुंजवरुन त्यांना बोलावणं आलं आणि पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं. वसंत मोरेंनी ही जबाबदारीही इमाने इतबारे पार पाडली. वसंत मोरेंचा हा झंझावात सुरूच होता. पण असं काय झालं की, आता त्यांचा हाच झंझावाताला थोडा ब्रेक लागलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांनी 2022 च्या गुढीपाडव्याच्या सभेला मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला आणि जर हे भोंगे नाही उतरवले तर त्यांना हनुमान चालीसा लावून उत्तर देण्याची भाषा राज यांनी केली. आणि वसंत मोरेंना नेमकं हेच खटकलं. 


वसंत मोरेंना नेमकं काय खटकलं? 


वसंत मोरे यांचा वॉर्ड पाहिला तर कात्रज आणि कोंढवा. पुण्यातील एकूण लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिम धर्मीयांची आहे. 2011च्या जनगणनेनुसार, पुण्यात 11.03% मुसलमान आहेत, तर Times of India च्या 2018 सालच्या एका वृत्तानुसार, फक्त कोंढाव्यात 3.5 लाख मुसलमान राहतात. तर या भागात 59 मशिदी आणि 22 मदरसे आहेत. याच भागात वसंत मोरेंनी मुस्लिम बांधवांची सेवा केली आहे. त्यांच्यासाठी हॉस्पिटलपासून ते अगदी दफनभूमी बांधून दिली आहे. आता कितीही नाही म्हटलं तरी, हा वसंत मोरे यांचा मतदार संघ. राज ठाकरे यांच्या नव्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे वसंत मोरेंना फटका बसण्याची चिन्ह नक्कीच आहेत. मोरेंची बाजू पाहिली तर याच मुस्लिम बांधवांनी त्यांना आजवर निवडून आणलं आहे. त्यामुळे पक्षाचा नवा 'राज आदेश' पाळणं त्यांना थोडं जड जातंय. वसंत मोरेंनी त्यांची खदखद व्यक्त केली आणि त्याचा प्रसादही त्यांना मिळाला. राज ठाकरेंनी थेट त्यांच्याकडून पुण्याचं शहर अध्यक्षपदच काढून घेतलं. 


साईनाथ बाबर हे पुण्याचे मनसेचे नवे शहराध्यक्ष झालेत, पण आता वसंत मोरे यांच पुढे काय होणार? हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. वसंत मोरे म्हणजे, एक सेल्फमेड नेता, त्यांना डिमांडही भारी आहे. इतर पक्षातून ऑफर देखील त्यांना आल्यात. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केल्याचं म्हटलं जातं आहे. 


11 April रोजी वसंत मोरे यांना राज ठाकरेंचं बोलानणं आलं आणि मोरे पुण्याहून थेट राज यांच्या निवास्थानी पोहोचले. राज भेटी आधी शर्मिला ठाकरे यांनी सुध्दा वसंत मोरेंची समजूत काढली तर राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्यानंंतर "मी सामाधानी आहे" असं वसंत मोरे म्हणाले.


वसंत मोरे यांचा सध्या पदभार काढून घेतला आहे, तर आतो पुढे काय होणार हे पाहण्यासारखं असेल हे नक्की.