औरंगाबाद : लग्नाळू मुलांना शोधून दोन- चार लाखात वधू विकणारे एक रॅकेट औरंगाबाद पोलिसांनी पकडलं आहे. चार महिलेंसह एका मुलीने मराठवाडा खानदेशसह गुजरातमध्ये एक दीड महिन्यात सात जणांसोबत लग्न लावून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
जळगावमधील एका मुलीने आणि तिच्या सोबत असलेल्या चार महिलांनी आजपर्यंत अनेकांना त्यांच्या सोबत लग्न करून गंडा घातला आहे. या मुलीने पैसे आणि दागिने यासाठी गेल्या दीड महिन्यात सात जणांसोबत विवाह केला आहे. आठवा विवाह 25 एप्रिलला धुळ्यात होणार होता. त्याआधी औरंगाबाद पोलिसांना तिला ताब्यात घेतले. त्याचं झालं असं खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. राजेश वाळूज येथे एका कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याची जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्याशी ओळख झाली. या मध्यस्थीच्या ओळखीतून एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. लग्नासाठी मुलीला 1लाख 30 हजार दिले. 70 हजारांचा सोनं केलं आणि धुमधडाक्यात लग्न लावून दिलं.
नवदांपत्य लग्नानंतर दौलताबादच्या किल्ल्यावर फिरण्यासाठी आले. नववधूने नवऱ्याला तिकीट काढायला सांगितलं आणि आपल्याला खायला आणते म्हणून रस्त्यावर आली. रस्त्यावर एकगाडी उभी होती. नववधू गाडीत बसली आणि पसार झाली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं.
राजेशने शोधाशोध केली पण ती काही सापडली नाही. त्यानंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि जी माहिती आली त्यातून पोलिसही अवाक झाले. या मुलींने आपल्या आशाबाई आणि लखाबाई नावाच्या मावशींसह अन्य दोन महिलांना पकडून मध्यस्थी करत गेल्या दीड महिन्यात तब्बल सात सात मुलांसोबत लग्न केल्याचं समोर आलंय.
यातील आशाबाई, लताबाई आपल्या दोन मैत्रिणी जळगावमध्ये अशा प्रकारचे रॉकेट चालवतात. शनिवार पेठ पोलिस ठाण्यामध्ये अशाच प्रकारचे लग्न लावल्या प्रकरणी अटक केली होती. मात्र. जामीनावर सुटका आज पुन्हा त्यांनी हा गोरखधंदा सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप या चार आरोपींना अटक करायचे आहे. पण मंडळी असल्या भामट्यापासून सावधान अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.