Pune News : भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या (indian army) सैन्यदलांमधील संयुक्त सैनिकी सरावाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे . दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात  21 मार्चला पुण्यातील लष्कराच्या औंध मधील परदेशी प्रशिक्षण केंद्रामधून होणार आहे. पहिल्या दिवशी भूसुरुंग शोध मोहिमेचा सराव केला जाणार आहे. आफ्रिका खंडातील 24 देशांच्या लष्करी तुकड्या भारतीय सैन्य दलांसोबत या संयुक्त सरावात सहभागी होणार आहेत .


या संयुक्त सरावाबरोबरच या आफ्रिकी देशांच्या लष्करप्रमुखांच्या भारतीय लष्कर प्रमुखांसोबतच्या परिषदेचेही यावेळी आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय लष्कर प्रमुखांबरोबरच 21आफ्रिकी  देशांचे लष्करप्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान संरक्षण विभागाला लागणाऱ्या सामग्रीचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे .


या सरावाचे उद्दिष्ट , संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शांतता राखण्यासाठी आयोजित संयुक्त मोहिमांमध्ये सामरिक कौशल्ये, कवायती आणि कार्यपद्धती  सक्षम करणे, आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्यांशी समन्वय आणि चांगले सबंध निर्माण करणे आणि भारतीय संरक्षण उद्योगांना प्रोत्साहन देणे हे आहे.10 दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात 21 मार्च 2023 रोजी परदेशी प्रशिक्षण नोड, औंध, पुणे येथे उद्घाटन समारंभाने होईल. या अभ्यासादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांनुसार मानवतावादी भुसुरूंग विरोधी मोहीम आणि शांतता प्रस्थापित कारवाई याबाबत संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. 


संयुक्त सराव आफ्रिका-इंडिया मिलिटरीज फॉर रीजनल युनिटी (AMRUT) च्या संकल्पनेला चालना देईल आणि  संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर भर देईल. हे सामूहिक प्रयत्न सर्व सहभागी राष्ट्रांमधील सैन्याची आंतरकार्यक्षमता आणि एकत्रित  क्षमता वाढविण्यासाठी  लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे शांतता राखण्याच्या मोहिमांमध्ये  जीवीत आणि मालमत्तेचा धोका कमी होईल.


आफ्रिका-इंडिया चीफ कॉन्क्लेव्ह


28 मार्च 2023 रोजी हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथे ही परिषद आयोजित केली जाणार आहे. यामध्ये भारत-आफ्रिका संरक्षण भागीदारी आणि भारत संरक्षण उद्योग संभाव्यता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी योगदान या विषयावरील चर्चेसाठी नामवंत वक्ते सहभागी होतील.   माननीय संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असतील आणि संमेलनाला संबोधित करतील.


जागतिक परिस्थिती आणि नवीन सुरक्षा आव्हाने यांच्या पार्श्वभूमीवर या  परिषदेमुळे सर्व सहभागी राष्ट्रांना या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याची संधी मिळेल ज्यामुळे प्रादेशिक सहकार्य वाढेल. सहभागी राष्ट्रांना भारतीय संरक्षण उद्योग आणि “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” सारख्या विविध योजनेच्या अंतर्गत चालू असलेल्या उपक्रमाविषयी देखील माहिती दिली जाईल. परिषदेदरम्यान विविध संरक्षण उत्पादन, उद्योगांना आफ्रिकी प्रतिनिधी भेट देतील .