Pune News : पुण्यातील बाणेर येथून अपहरण झालेला डॉ. सतीश चव्हाण यांचा चिमुरडा स्वर्णव चव्हाण सुखरुप घरी परतला. आठ दिवसांपासून बेपत्ता असलेला स्वर्णव घरी परतल्यामुळं संपूर्ण कुटुंब आनंद साजरा करत होतं. परंतु, हा आनंद काही काळापुरताच मर्यादित राहिला. रात्रीच नांदेडवरुन भाच्याला भेटण्यासाठी पुण्याच्या दिशेनं रवाना झालेल्या स्वर्णवच्या आत्याचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


सुनीता संतोष राठोड-चव्हाण (वय 36) असं स्वर्णवच्या आत्याचं नाव आहे. नगर महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा अपघातात मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणजेच, त्यांची दोन मुलं आणि पती देखील पुण्याला निघाले होते. समर राठोड (वय 14) आणि अमन राठोड (वय 6) ही दोन्ही मुलं अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आहेत. तर त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांना उपचारासाठी पुण्यात बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


कालच स्वर्णव चव्हाण सापडल्याचा आनंद सर्व कुटुंबीय आणि बाणेर परिसरात साजरा केला जात होता. या घटनेमुळे बाणेर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.


दरम्यान, पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला चिमुरडा सापडला. स्वर्णव चव्हाण (डुग्गु),वय 4, असं या मुलाचं नाव आहे. या मुलाचं बालेवाडीमधून झाले अपहरण होते. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास तीनशे ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलं आणि स्वर्णव सुखरुप घरी पोहोचला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha