Pune News : देव तारी त्याला कोण (Pune news) मारी हे आपण ऐकलं आहे. मात्र याचीच प्रचिती पुण्यातील खंडाळ्यात आली आहे. खंडाळ्याच्या मंकीहिल पॉईंट येथील दरीत 200 फूट पडलेल्या एका तरुणाला रिक्षाचालकाच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले असून बचाव पथकांकडून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रात्री 11 वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन तीन तासाने म्हणजे मध्यरात्री 2 वाजता संपले. हरिश्चंद्र मंडल ( वय - 25,  मूळ रा. ओरिसा, सध्या गोवा) असे या युवकाचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र हा पर्यटनासाठी आणि खास करून ट्रेकिंगसाठी गोवा येथे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सुपरवायझर पोस्ट वरती काम करत आहे. गुरुवारी तो खंडाळा घाटामध्ये ट्रेकिंगसाठी आला होता. खंडाळ्यातील वाघजई मंदिरापाठीमागे मंकीहिल भागातील डोंगरात फिरत असताना तो रस्ता चुकला आणि संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून सुमारे 200  फूट खोल दरीमध्ये पडला.


अंधार पडलेला असल्याने त्याला काही सुचत नव्हतं. तो ज्या रिक्षातून प्रवास करुन घाटात फिरण्यासाठी आला होता. त्या रिक्षाचालकाला संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगून मदतीची मागणी केली. रिक्षा चालकाने लोणावळा पोलीस स्टेशन आणि शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्याशी संपर्क साधला.


शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल मावळ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य मदतीला आले. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळ्याचे दोन सदस्य रोपच्या सहाय्याने खाली उतरले, मात्र त्यांना हरिश्चंद्र मंडलचा अंधारात काही पत्ता लागत नव्हता आणि तो देखील घाबरलेला होता त्यामुळे कोणाच्याही हाकेला तो प्रतिसाद देत नव्हता. तरी देखील खाली उतरलेल्या दोन मेंबर्सनी त्याला शोधण्याची जिद्द सोडली नव्हती. अखेर काही वेळाने हरिश्चंद्र मंडल सापडला. दरम्यान, सर्वांनी अत्यंत कसोशीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप सुरक्षित स्थळी आणून एनर्जी ड्रिंक आणि थोडं खायला दिलं. त्यानंतर त्याला लोणावळा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.


अॅपल वॉचने वाचवले  होते प्राण...


यापूर्वी लोणावळ्याच्या दरीत चुकून रात्रीच्यावेळी पडलेल्या मुंबईच्या एका तरुणाचा बचाव करण्यात आला होता. अॅपल वॉचच्या मार्फत त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता. त्याचं लोकेशन डिटेक्ट करुन बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. त्यानंतर या तरुणाने अॅपल कंपनीच्या सिस्टीमचे आभार मानले होते.