पुणे : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात तब्बल 150 मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचं शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं?


मंत्रालयात बॉम्ब ठेऊन उडवून देण्याचा ईमेल आला आणि संपूर्ण राज्यच हादरलं. पुण्यातील शैलेश शिंदे या व्यक्तीने मंत्रालयात संतापून धमकीचा ईमेल पाठवला होता. सोमवारी सायंकाळी ही बाब समोर येताच त्याला पुणे पोलिसांनी अटक केली. आणि नंतर पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही बातमी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली. ईमेल पाठवून लक्ष वेधण्याचा शैलेश शिंदे यांचा उद्देश गांभीर्याने घ्यायला हवा. 


शैलेश शिंदे यांच्या मुलांना शाळेत त्रास होतो म्हणून वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रार केली गेली होती. त्याची दखल घेतली न गेल्यानं शिंदे यांनी ही भूमिका घेतली. शिंदे यांचे पाल्य हचिंग्स या शाळेत शिकत आहेत. शाळेकडून फी वाढीवरुन शिंदे यांच्या मुलांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. यावरुन शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन देखील केलं होतं. मात्र हचिंग्स या शाळेने बोर्ड वेगळे असल्याचं सांगून मुलांवर कुठलाही अन्याय झाला नसल्याचा खुलासा पत्राद्वारे केला.


शैलेश शिंदे यांचे कृत्य बरोबर की चुकीचे हे तपासात समोर येईलच. मात्र शिक्षण विभागातील हा प्रकार गंभीर आहे. शिक्षण विभागही तक्रारींकडे काणाडोळा करत असेल तर गंभीर आहे. त्यामुळे यंत्रणा जाग्या होतील का हा खरा सवाल आहे.