Pune MPSC News : एमपीएससी (MPSC) अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सहा सदस्य असणं अपेक्षित आहे. मात्र गेले अनेक महिने तीनच सदस्य काम पाहत आहेत. तीन जागा रिक्त आहेत. यामुळे तब्बल पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती (Interview) रखडल्या आहेत. हे पाच हजार उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी निवड झालेले हे उमेदवार आहेत. मुलाखती होत नसल्याने दीड ते दोन वर्षं वाया गेली आहेत. तर सरकारलाही मनुष्यबळ मिळत नाही. 


मुलाखती घेणाऱ्या पॅनलमध्ये आयोगाचा एक सदस्य असणं बंधनकारक


एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जी तज्ज्ञांची पॅनल तयार केली जातात त्या प्रत्येक पॅनलमध्ये आयोगाचा एक तरी सदस्य असणं बंधनकारक असतं. मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीनच सदस्य असल्याने मुलाखतीसाठी तीनच पॅनेल तयार होऊ शकत आहेत. त्यामुळे मुलाखतींना वेळ लागत आहे. 


कोणकोणत्या पदांच्या मुलाखती रखडल्या?


- 2021 साली झालेल्या राज्यसेवेच्या 405 पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 1245 उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. 
- 2021 मध्ये एफएमसीच्या 63 पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 200 उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. 
- 2020 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 2600 उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. 
- 2021 मध्ये 376 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 1504 उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. 
- 2022 साली राज्यसेवेच्या 615 पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 1845 उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या नाहीत. 
- 2022 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 2600 उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत. 


तातडीने आयोगाच्या रिक्त जागा भरा, उमेदवारांची मागणी


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पुरेसे सदस्य नसल्याने जवळपास पाच हजारांहून अधिक मुलाखती रखडल्या आहे. त्यात आता पुढील वर्षातील परीक्षांच्या मुलाखतींचीही त्यात भर पडणार आहे. एमपीएससीकडून सातत्याने होत असलेल्या या दिरंगाईला विद्यार्थी कंटाळले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने आयोगाचे सर्व सदस्य भरावेत आणि मुलाखती घ्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.


एमपीएससीमार्फत विविध शासकीय पदांसाठी परीक्षा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी या औरंगाबाद, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जातात. राज्य सरकारच्या पदभरतीच्या धोरणानुसार 50 टक्के जागा राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी), सरळसेवा परीक्षांद्वारे भरल्या जातात. 25 टक्के रिक्त जागा या खातेअंतर्गत परीक्षांमधून होतात. उर्वरित 25 टक्के जागा पदोन्नतीद्वारे भरण्यात येतात.