पुणे : मनसेतील अंतर्गत गटाबाजीला कंटाळून वसंत मोरेंनी(Vasant More) राजीनामा दिला. त्यानंतर पुण्यात मनसे खिळखिळी झाली असं बोललं जात होतं. मात्र आता मनसेचे कबमॅकसाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. त्यात कात्रज हा वसंत मोरेंमुळे मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र त्यांनीच सोडचिठ्ठी दिल्याने आता मनसेने कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी थेट वसंत मोरेंना इशारा देणारे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे आता मनसे पुण्यात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. 


कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. मनसेचे पुणे शहर संघटक गणेश नाईकवाडे यांनी हा बॅनर कात्रजमधील विविध चौकांमध्ये लावला आहे. या बॅनरवर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकऱ्यांचे फोटो लावले आहेत. मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेने आता आपला जम बसवायला सुरुवात केली आहे. त्यातच येत्या काळात मनसे एकत्र येऊन कदाचित वसंत मोरेंच्या विरोधात उभी ठाकणार असल्याचं या बॅनरवरुन दिसत आहे. 


मनसे चित्रपटसेना सक्रिय


मनसे चित्रपट सेनेने पक्षबांधणीसाठी कंबर कसली असून. पुणे शहरातील विविध विधानसभा मतदार संघात नव्या पदनियुक्त्या आज करण्यात आल्या. यात पुण्यातील विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि अभिनेत्यांनी मनसे चित्रपटसेनेत प्रवेश घेतला. यावेळी अभिनेते रमेश परदेशी आणि पुणे शहर चित्रपटसेनेचे अध्यक्ष चेतन धोत्रे , आनंद कुंदूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या सगळ्यांत मनसे चित्रपटसेना तरुण पिढीच्या प्रश्नांना आणि कलाकारांच्या समस्यांना प्राधान्य देणार आहे. येत्या काळात हेच कलाकार आपल्या हक्कासाठी लढणार आहेत


तर दुसरीकडे वसंत मोरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहे. आधी शरद पवार त्यांनतर थेट मुंबई गाठून वसंत मोरेंनी संजय राऊतांची भेट घेतली. मात्र अजून कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही आहे. सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत असल्याने ते महाविकास आघाडीतील एकापक्षात प्रवेश घेण्याची शक्यता बोलली जात आहे. त्यासोबत मी पुणे लोकसभेसाठी इच्छूक आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर लोकसभेच्या जागेसाठीच मी सगळ्यांच्या भेटी घेत आहे, असंही ते म्हणाले आहेत. 
 


फेसबुक पोस्टमधून मनसेच्या नेत्यांना इशारा


पक्षात माझा सतत अपमान होत आहे. माझ्या पक्षिष्ठेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हे मला सहन होत नाही आहे, असं म्हणत वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिला. त्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या. त्यांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे राज ठाकरे यांना धक्का बसला आहे. साधारण मागील काही महिन्यांपासून पक्षातील गटबाजीमुळे वसंत मोरे त्रस्त झाले होते. हे त्यांच्या राजीनाम्याचं कारण ठरलं होतं. यातच आता वसंत मोरेंनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना दिली आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. मला ग्रुप मधून काढून टाकताल पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार, अशा आशयाची त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सोशल मी़डियावरील अनेक गृप लेफ्ट केले असावेत किंवा स्थानिक गटबाजीमुळे त्यांना गृपमधून काढून टाकलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी ही पोस्ट करुन मनसेच्याच नेत्यांवर निशाणा साधला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Deepak Kesarkar Meet Vijay Shivtare : दीपक केसरकर आणि विजय शिवतारेंमध्ये पुण्यातील रुग्णालयात बंद दाराआड चर्चा; नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न?