पुणे : लष्करातील जवानाच्या प्रेमात (Pune Crime news) पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत, एक कोटींचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकानं त्यांचं बिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्यात. यामुळं सैन्य दलात खळबळ उडाली. सुप्रिया गाडेकर असं पत्नीचं, सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचे नाव आहे. तर राहुल गाडेकर असं मयताचे नाव आहे.
सुप्रिया आणि सुरेशने कट रचला अन्...
राहुल आणि सुप्रियाचे सहा वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना चार वर्षाचा मुलगा ही आहे. संसार सुखात सुरु होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत सत्तर हजारांच्या नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोनाकाळात तिने लॅब सुरु केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचे ही चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्यांना ही दोन वर्षांची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरु असताना ही त्यांनी याची कोणतीच फिकीर नव्हती. अशात सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरलं. राहुलचा अडथळा दूर करताना त्याच्या नावे असणारा एक कोटींचा विमा हडपायचा, असा ही डाव त्यांनी आखला.
पुणे-नाशिक महामार्गावर पतीवर हल्ला केला पण राहुल...
ठरल्याप्रमाणे तीन महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देहूत त्याच्या घरी आला. अहमदनगर जिल्ह्यातील आते-बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितलं आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले जातील, असं सांगून त्याला ही या कटात सहभागी करून घेतलं. दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून, राहुल कामावर येत होता. याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियकर सुरेशला दिली. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासने पाठलाग सुरु केला, पुढं घारगाव जवळ या दोघांनी राहुलच्या गाडीवर हल्ला करत, त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण राहुल यातून बचावला. जखमी अवस्थेत राहुल नगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.
या घटनेमुळं घाबरलेल्या राहुलने घरातचं राहणं पसंत केलं. मात्र पत्नी सुप्रियाने किती दिवस घरी बसून राहणार, असं म्हणत कामावर जाण्याचा तगादा लावला. मग राहुलने कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरु करून घेतली आणि नऱ्हे आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचं ठरवलं. याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली. मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली. 23 फेब्रुवारीला पती पत्नीच्या मामाच्या घरातून चाकण एमआयडीसीमधील कंपनीत कामासाठी निघाला. तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठलं.
गाडी आडवी मारून त्याला खाली पाडलं, मग पाठीवर उभं राहून, हातोडीनं डोक्यावर प्रहार केला. त्याचा मृत्यू झालाय हे पडताळून, ते दोघे तिथून पसार झाले. मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झालाय, असा बनाव केला. राहुलच्या नामे एक कोटींचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास केला अन पत्नीसह प्रियकराचे बिंग फुटले. पत्नीला तर घरूनच बेड्या ठोकल्या, पण लष्करात कार्यरत असणारा सुरेश आधी दिल्ली अन तिथून सैन्य दलातील टप्प्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तिथं जाऊन सुरेशला आणि रोहिदासला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. तिघांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
इतर महत्वाची बातमी-