पुणे : पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशाने आपल्याच इमारतीतील एका घरात चोरी केली. तब्बल 10 लाख रुपयांचा ऐवज चोराने लंपास केला होता, मात्र अवघ्या दोन तासात त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं.
पुण्यातील चंदननगर परिसरात जुना मुंढवा रस्त्यावर असलेल्या 'अल्टीस ड्रोम' सोसायटीत हा प्रकार घडला. 39 वर्षीय पीटर डी रीबेलाने आपल्याच सोसायटीत राहणाऱ्या अग्रवालांच्या फ्लॅटमध्ये चोरी केली.
घरात कोणी नसल्याचं पाहून 6 मे रोजी दुपारी पीटरने बाल्कनीतून प्रवेश केला. घरी परत आल्यावर अग्रवाल कुटुंबाला बाल्कनीच्या दाराचं कुलूप तुटलेलं दिसलं. बेडरुममध्ये पाहिलं असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने, हिरे असा ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ चंदननगर पोलिस स्टेशनला याची माहिती दिली.
पीटरची चोरी पोलिसांच्या खबऱ्यामुळे अवघ्या दोन तासात उघडकीस आली. त्याच्याकडून दहा लाख 67 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रीबेलाने तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अग्रवाल यांच्या घरातून स्पीकर चोरले होते. त्याने केलेल्या इतर घरफोड्या उघडकीस आणून आणखी 40 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रीबेला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2012 ते 2015 या कालावधीत 26 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे रीबेलाची पत्नी आयटी इंजिनियर असून एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते. गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य सोसायटीत राहत आहे. गेल्या तीन वर्षात त्याने एकही चोरी केली नव्हती, परंतु पैशाची चणचण असल्याने त्याने ही चोरी केल्याची शक्यता आहे.
पुण्यात आयटी इंजिनिअरच्या पतीची शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 May 2018 08:21 AM (IST)
पुण्यातील चंदननगर परिसरात असलेल्या 'अल्टीस ड्रोम' सोसायटीत राहणाऱ्या आयटी इंजिनिअरच्या पतीने आपल्याच शेजाऱ्याकडे 10 लाखांची चोरी केली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -