पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून पाच कोटींची मदत मिळणार आहे. बाबासाहेब पुरंदरे पुण्यातील कात्रज भागात उभारत असलेल्या शिवसृष्टीला नितीन गडकरी यांच्या खात्याकडून जेएनपीटी अंतर्गत पाच कोटी रुपयांचा चेक देण्यात येणार आहे.


शनिवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहेत.

एकीकडे राज्य सरकारने पुण्यातील बावधन भागातील बीडीपीच्या जागेवर 50 एकरात शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे.

राज्य सरकारच्या शिवसृष्टीबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. तर पुरंदरेंच्या शिवसृष्टीला पाच कोटींची मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हं आहेत.