पुणे : कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला आहे. त्याचा संग्रहालय प्रशासनाकडून शोध सुरु आहे. मात्र तो सापडला नसल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे.
पिंजऱ्याचे गज वाकवून बिबट्या पळाला
पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळाला. पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगितलं जातंय. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आला. एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय.
कर्नाटकातील हंपीतून बिबट्या आणला होता
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
मात्र सोमवारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही. पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो पसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पसार झालेल्या बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगण्यात येतय.
पर्यटकांसाठी प्राणी संग्रहालय बंद
बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळपासून बिबट्याला शोधण्यासाठी प्राणी संग्रहालयात पथके तैनात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत बिबट्या निदर्शनास आला नाही. प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे शंभरहून अधिक प्राणी आहेत. तसेच प्राणीसंग्रहालयाच्या शेजारी दाट लोकवस्ती आहे.
ही बातमी वाचा: