Amol Kolhe Reply to Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक वॉर थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. दोघांमध्ये आज दिवसभर शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. काही लोक बोलघेवडे आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि ते लक्षात घ्या, असं अजित पवार (Ajit Pawar) मंचर येथील सभेत म्हणाले होते. अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्तुत्तर दिलंय.
लक्ष्याचा व्हिडीओ पोस्ट करत अमोल कोल्हेंचं जोरदार प्रत्युत्तर
अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देताना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये लक्ष्या म्हणतो, "साहेब मला एक कळत नाही. डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, व्यापारी सगळे आमदार होऊ शकतेत. मग हा कलावंत यांच्या घशात का अडकतो? मासा अडकल्याप्रमाणे" अमोल कोल्हेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या डायलॉगच्या माध्यमातून अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांनी संसदेत केलेल्या कामगिरीचा लेखाजोगाही दाखवलाय.
सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन चूक केली
राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला. सेलिब्रिटींना मतदारांचे काही पडलेले नसते. आपण राजबिंडा पाहून निवडून देत असतो. सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन आम्हीही चूक केली. माझी आणि अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर भेट झाली होती. मी त्यांना म्हटलो की, डॉक्टर आधी राजीनामा द्यायचाय असं म्हणत होते, आता परत दंड थोपटत आहात. तर ते म्हणाले, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते.
तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी, मला 3 वेळेस संसदरत्न
अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांनी ज्या सेलिब्रिटी खासदारांची उदाहरणे दिली, त्यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली. मात्र, यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मला 3 वेळेस संसदरत्न मिळालाय. तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, असंही कोल्हे यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या