पिंपरी-चिंचवड: शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आमच्याकडे कोणताच पर्याय नसतो तेव्हा आम्ही कलाकाराला निवडणुकीला उभं करतो, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हेंची नुकतीच खिल्ली उडवली होती. त्यावर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षात घेण्यासाठी अजितदादा 10-10 वेळा कशासाठी निरोप पाठवत आहेत, असा सवाल विचारला होता. यानंतर अजित पवार यांनी आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्या चौफेर टीका करत थेट त्यांच्या स्वाभिमानालाच हात घातला आहे. ते सोमवारी पिंपरी-चिंचवड येथे वज्रमूठ सभेत बोलत होते.


यावेळी अजित पवार यांनी आक्रमक शैलीत अमोल कोल्हेंचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, काही लोक बोलघेवडे आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि ते लक्षात घ्या. काहींनी मंचरमध्ये सभा घेऊन स्वाभिमानाच्या बढाया मारल्या. पण जे लोक तीन पक्ष फिरून आले आहेत त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत, असा टोला अजित पवारांनी लगावला. 


कुकडी प्रकल्पाचे श्रेय शरद पवारांना दिलं जात असताना अजित पवारांनी शेतकरी मेळाव्यातुन कुकडी प्रकल्प हा दिलीप वळसे पाटीलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील यांनी १९६८ साली याची संकल्पना मांडल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. आम्ही बेरजेचे राजकारण करत आहोत. पण यात आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.


रोहित पवार यांना अजित पवारांचा टोला


आमदार रोहित पवार आणि अतुल बेनके यांच्यात सध्या जुन्नर तालुक्याचे पाणी कर्जत-जामखेडला वळवल्यावरुन वाद सुरु आहे. अतुल बेनके यांनी याप्रकरणात रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. याबाबत बोलताना अजित पवारांनी म्हटले की, अतुल बेनके बोलले त्यात काही खोटेपणा नाही. जर तुमचं पाणी कोणी पळवून नेत असेल. कोणता प्रतिनिधी ते कसे खपवून घेईल, असा सवाल अजितदादांनी विचारला. पण काही जण वेगळ्या प्रकारच्या वलग्ना करतात. मात्र त्यांचं खरं दुखणं वेगळं आहे, असा टोला अजितदादांनी रोहित पवारांना लगावला.


शिरूर लोकसभा राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता


शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची दाट शक्यता आहे. इथं महायुती म्हणून आपण उमेदवार देणार आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचं आहे. यात आपण मागे राहायचे नाही. तुम्ही म्हणाल आमचे प्रश्न? आम्ही शेतकरी आहोच. तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, पडेल ती किंमत मोजू पण तुम्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. 


आणखी वाचा


तेव्हाच आम्ही कलाकाराला निवडणुकीत उभं करतो; खा. अमोल कोल्हेंची अजित पवारांनी खिल्ली उडवली!