पुणे : पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime) सत्र वाढत चालल्याचं चित्र आहे. दरम्यान अनेक गुन्हे सध्या पुण्यातून समोर येतायत. त्यातच निवृत्त पोलिसाचा मुलगा असलेल्या विजय ढुमेची हत्या झाली आणि पुण्यात एकच खळबळ माजली. या हत्येमुळे पुन्हा एकदा पुणं हादरलं. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील अशा घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान या प्रकणात पुणे पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. विजय ढुमेची हत्या लव्ह ट्रँगलमुळे हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
विजय ढुमेची पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये लाईन बॉय म्हणून ओळख होती. त्याच्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ माजली होती. पण सिंहगड पोलिसांनी अगदी काहीच वेळात या हत्याकांडाचा छडा लावला. तर या गुन्ह्यांमधील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमंक प्रकरण काय?
प्रेम संबंधांमुळे विजयची हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. विजय याचं लग्न झालं असलं तरीही मागील तेरा वर्षांपासून त्याचं सुजाता ढमाल या महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. पण मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद होऊ लागले. त्यातच सुजाताची चार महिन्यांपूर्वी संदीप तुपे या सत्तावीस वर्षीय तरुणाशी झाली. त्यामुळे सुजाता आणि संदीप यांच्या नव्या प्रेमप्रकरणात विजय ढुमेचा अडथळा होऊ लागला. म्हणूनच या दोघांनाही विजय ढुमेची हत्या करण्याचा कट रचला.
... आणि विजयचं आयुष्य संपलं
29 सप्टेंबर रोजी विजय सिंहगड रोडवरील एका लॉजमधून बाहेर येत होता. त्यावेळी संदीप आणि त्याच्या मित्रांनी लोखंडी सळी आणि लाकडाचा वापर करुन त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी विजयचा जागीच मृत्यू झाला. याबाबत आजूबाजूच्या लोकांना तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
प्रकरणाचा तपास करण्याचं पोलिसांसमोर आव्हान
पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण गजबजलेल्या परिसरामध्ये विजयची हत्या झाल्याने या प्रकरणाचा शोध लावणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्यातही पोलिसांना फारसं यश आलं नाही. पण तपासादरम्यान पोलिसांना विजयच्या फोनमध्ये सुजाताचे काही फोटो सापडले. तेव्हा पोलिसांना या लव्ह ट्रॅन्गल आणि त्यातून झालेल्या या हत्येचा उलगडा झाला .
दरम्यान सुजाता हिचं देखील आधी लग्न झालं होतं. पण ती तिच्या नवऱ्यासोबत राहत नव्हती. तर विजय ढुमे याची विवध क्षेत्रात बरीच ओळख होती. त्यातूनच त्याने जमीन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यातूनच तो सुजाताला पैसे पुरवायचा. पण त्याच वेळी त्यांने सुजातावर देखील काही बंधनं घातली. तिला तो नोकरी करण्यासाठी देखील परवानगी देत नव्हता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सतत खटके उडत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी संदीप तुपे, सागर तूप सुंदर, प्रथमेश खंदारे, एक अल्पवयीन मुलगा आणि विजयची प्रेयसी यांना ताब्यात घेतलं आहे.