पुणे : पुणे कॉंग्रेसमध्ये असलेली अंतर्गंत धूसफूस सलग दोन बैठकींमधून (Pune Congress)  समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक ट्रस्टने दिलेल्या पुरस्कारावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लावलेल्या फ्लेक्सवर माजी आमदाराचा फोटो का नाही? यावरुन वाद झाला आणि हाच वाद थेट हाणामारीपर्यंत पोहचल्याचं पाहायला मिळालं. 


बैठकीच्या वेळी नेमकं काय घडलं?


महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची  कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या पोस्टरवर स्थानिक नेत्याचा फोटो नव्हता. हे पाहून माजी आमदाराच्या मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानंतर माजी आमदाराच्या मुलाने मंडपवाल्याची वादावादी केली. हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला माराहाणदेखील केली. त्यामुळे काही काळ या बैठकीत चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यात अनेक वर्ष काँग्रेससाठीच काम करणाऱ्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मुलाला मारहाणदेखील करण्यात आली.  


साधारण  महाविकास आघाडीच्या प्रत्येक बैठकीसाठीचं मंडपाचं आणि बाकी नियोजनाचं काम मारहाण झालेल्या व्यक्तीने घेतले आहे. त्यानुसाबैठकीसाठीचा फ्लेक्स तयार करुन घेतला होता आणि तो बैठकीच्या ठिकाणी लावला होता. मात्र हा फ्लेक्स मी तयार केला नाही, असं या मारहाण झालेला व्यक्ती सांगतच होता. मात्र तरीही त्याला मारहाण करण्यात आली. या नंतर काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आणि बैठक पार पडली. 


पुण्यातील कॉंग्रेसमध्ये मागील काही महिन्यांपासून अंतर्गत धूसफूस असल्याचं दिसत आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गंत नाराजीमुळे रवींद्र धंगेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच रवींद्र धंगेकरांना फटका बसू नये, यासाठी कॉंग्रेसचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे. कॉंग्रेसमधील नाराजी नाट्य शमवण्याचे प्रयत्न या पथकाकडून केले जात आहे. पुण्यात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचितकडून वसंत मोरे उभे आहेत. त्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. या तिन्ही उमेदवारांकडून मीच खासदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता पुणेकर कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Water Crisis : पुण्याची वाटचाल वाळवंट होण्याच्या दिशेने सुरु; रोज हजारो टँकरने पाणीपुरवठा!