Pune Latest News : पुण्यातील पाषाण सुस खिंडीतील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलेलं पाहायला मिळतंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुलाची आज पाहणी केली मात्र त्या आधीच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवक यांनी त्या पुलाचे उद्घाटन केले होते. मात्र दुसऱ्या बाजूला भाजप ने या उद्घाटनाला विरोध केला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात..
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पुणेकरांना सतवणारी वाहतूक कोंडी. काही महिन्यांपासून पुणेकर खड्डे तसेच वाहतूक कोंडीतून वाट काढत रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. वाहतुकीचे प्रश्न गंभीर असताना सुद्धा सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मात्र एका उड्डाणपुलाच्या उद्घटनावरून श्रेयवाद रंगताना दिसतोय.
पाषाण सुस रोड हा एकाबजूने हिंजवडी तर दुसरी बाजूने शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारा रस्ता. त्या ठिकाणी गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडी होत होती आणि यासाठी महापालिकेने तिथे उड्डाणपूल बांधण्याचे ठरवले. गेली २ ते ३ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. आज या पुलाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. मात्र हा पुल राष्ट्रवादी काँग्रेस मुळे तयार झाला असल्याचे सांगत सुप्रिया सुळे येण्या अगोदर ढोल ताशांच्या गजरात इथल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पुलाचे उद्घाटन देखील करून टाकले. सुप्रिया सुळे यांनी हा विषय श्रेय वादाचा नसून लोकांच्या सुरक्षतेचा असं सांगत लवकरात लवकर शासनाने इथल्या सर्व्हिस रोडचे काम करावं अशी मागणी केली.
दुसऱ्या बाजूला, पुणे महानगर पालिकेवर सत्तेत असणाऱ्या भाजप ने मात्र या पुलाच्या उद्घाटनाचा विरोध केला आहे. भौगोलिक दृष्ट्या सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघात हा पुल येत नसून त्यांनी या पुलाचे उद्घाटन केलेच कसे असा प्रश्न भाजप ने विचारला तसच भाजप ने या पुलासाठी सगळा निधी जमवला असून या पुलाचे काम अजूनही राहिले आहे यामुळे इथे कुठला ही अपघात झाला तर त्याला राष्ट्रवादी जबाबदार असेल असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मात्र भाजप ने लावलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ने खोडून काढत भाजपच्या मंत्र्यांना हे काम पाहायला वेळ नाही असे सांगत स्थानिकांना वेठीस धरू नये असा इशारा दिला
श्रेयवाद हा पुणे शहरासाठी नवीन नाही. याआधी देखील अनेक रस्त्यांना नावे देण्यावरून, उड्डाणपूलाचे नामकरणावरुन हे मुद्दे समोर आले आहेत. पुणेकरांचे अनेक गंभीर प्रश्न समोर असताना सुद्धा आता उड्डाणपुलावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.