Amol Kolhe : अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलेय.  अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असं अजित पवार म्हणाले होते. याबाबत अमोल कोल्हे यांनी आज मत व्यक्त केलेय. अजित दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, असेही अमोल कोल्हे म्हणाले. 


किल्ले शिवनेरीपासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू झालाय. या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणते ही दडपण नाही, असं मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केलं. चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून अन बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. याद्वारे अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत. असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावला. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात त्यांच्या बघिणी सुप्रिया सुळे ही या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. 


शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत - अमोल कोल्हे 


25 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकतं तर खणाऱ्याना रास्त किंमतीत उपबध करून त्यावर सबसिडी मिळावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.आढळराव यांना शुभेच्छा. ते एक वयस्कर नेते आहेत डिजिटल युगाची त्यांना ज्ञात नसावी. कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आमची साधी मागणी आहे. निवडणूक हा गौण भाग आहे, मिळणाऱ्या पदाला काय चाटायचे आहे का? आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे अमोल कोल्हे म्हणाले. 


अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आहे कोणी हिला रोखू शकणार नाही, असेही अमोल कोल्हे म्हणाले. 


किती जणांचा कांदा खरेदी झाला? - अमोल कोल्हे


कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले, तेंव्हा कांदा निर्यात धोरण आणलं. आपण रस्त्यावर उतरलो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जपानमधून ट्विट केलं, शेतकऱ्यांचा कांदा नाफेडद्वारे खरेदी करणार, किती जणांचा कांदा खरेदी झाला, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलाय.


आता लढायचं, थांबायचं नाय - अमोल कोल्हे 


दूध उत्पादक शेतकऱयांची फसवणूक करतात. सरकारी दूध डेअरी मध्ये 5 टक्के अनुदान मात्र खाजगी दूध डेअरी मध्ये अनुदान नाही. असा भेदभाव का? 25 लाख कोटींचे कर्ज मोठ्या उद्योजकांचे माफ होतात, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल, तर सरकारला लाज वाटायला हवी.


आता या मोर्चाबद्दल बोलतायेत. त्या मोठ्या व्यक्तींनी काही वाटत असेल त्यांनी शेतकऱ्यांचं हित जोपासवे. आता लढायचं, थांबायचं न्हाय, असे अमोल कोल्हे म्हणाले.