Pune Koyta Gang : पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील अनेक परिसरात दहशत निर्माण केली आहे तर अनेक परिसरातील वाहनांचं मोठं नुकसान केलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आली आहे. वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. यात वाहनांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. 


वारजे रामनगर कॅनाॅल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या  एकुण 7 वाहनांवर लोखंडी कोयत्याने प्रहार करून काचा फोडून वाहनांचे नुकसान केल्याची घटना  वारजेतील रामनगर कॅनाॅल रस्त्यावर सोमवारी (दि. 19 जुन ) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा या दुचाकी वरून गेलेल्या अज्ञात 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता  नागरिकांनी वर्तविली आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल होत. माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 


यामध्ये दोन आॅटो रिक्षा, एक महिंद्रा झायलो, एक इको कार, तसेच एका सफारी कार व दोन दुचाकींचा समावेश आहे. 2017 नंतर रामनगर परीसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु दोन दिवसांपूर्वीच याच रामनगर परीसरात गोळीबार घडल्याची  घटना ताजी असतानाच टवाळखोरांनी पुन्हा तोंड वर काढून आज सामान्य नागरीकांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरीक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करीत रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


कोयता गँगनं तोडला हात...


पुण्यात किरकोळ वादामुळे कोयत्याने केलेल्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी पूर्ववैमनस्यातून पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करुन एकाचा हात तोडल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली होती. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलं आणि त्यासोबतच आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. अखिलेश ऊर्फ लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी असे या तरुणाचं नाव होतं. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला होता.


संबंधित बातमी-


Honey bee Attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; सिंहगड किल्ल्यावरील घटना; वनविभागाकडून खबरदारीचा सल्ला