पुणे : देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या ,अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 22  मे रोजी  पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही यात्रा काढली होती त्यावरून दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलवली आहे.  देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे  तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या अशी मागणी आहे  माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इंदापुरात दिली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला आणि या दरम्यान सदाभाऊ खोत बोलत होते.


गाईच्या दुधाला 75 तर म्हशीला सव्वाशे रुपये दर द्या


गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे आणि हे अवघड नाही. महागाई वगैरे काही वाढत नाही उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित  कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.


 शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे हे विसरु नका, सदाभाऊ खोतांचा मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांना सल्ला


जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचं भविष्य उज्वल असेल, सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे.   शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.


 संजय राऊत म्हणजे दादा कोंडकेंच्या इच्छा माझी पुरी करा चित्रपटाचा पार्ट टू 


जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकासआघाडी बरोबर राहू आणि त्यानंतर स्वतःचा भगवा फडकवू असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा कोंडके यांचा एक चित्रपट होता इच्छा माझी पुरी करा, त्यानंतर दादा कोंडके यांचा टू पार्ट म्हणजे संजय राऊत, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.


शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी एक जुलैला कारखान्यासमोर एक दिवस धरणे आंदोलन करणार  


 गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागा करू कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत.  इथल्या साखर कारखानदारांने खऱ्या अर्थाने ते पैसे दिले नाहीत,पैसे देणे गरजेचे आहे.  पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांकडे अनेक समस्या आहेत. जर 30 जून पर्यंत पैसे दिले नाहीत तर एक जुलै रोजी साखर कारखान्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.