पुण्यातील कल्याणीनगर (Kalyani Nagar accident Update) भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणात वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. दोषारोप पत्रात हे नमूद करण्यात आले आहे. नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे.


कल्याणीनगर येथे मध्यरात्री अपघात  (Kalyani Nagar accident Update) झाल्यानंतर 19 मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता येरवडा पोलिस कारचालक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या सोबत अपघातग्रस्त कारमध्ये असलेले दोन मित्र अशा तिघांना घेऊन त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केले आहे का? हे पाहण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी प्रथमोपचार विभागाचा प्रमुख डॉ. श्रीहरी हाळनोर हा उपस्थित होता. त्याच्यासमोरच या तीन मुलांना हजर करण्यात आले होते. हाळनोर याने तीन मुलांना काय त्रास होतोय का, असे विचारून वैद्यकीय केसपेपर तयार केले.


दरम्यान, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख असेला डॉ. अजय तावरे याने अगोदरच डॉ. हाळनोर याला सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार हाळनोर याने सीएमओ रुमच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्टरुममध्ये कारचालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने घेतले. यानंतर आणखी तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने त्याच खोलीत घेण्यात आले. त्यामध्ये अल्पवयीन कार चालक मुलासाठी एका महिलेचे, तर त्याच्या दोन मित्रांसाठी इतर दोन व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर मुलाचे आणि त्याच्या मित्रांचे रक्तांचे नमुने डॉ. हाळनोर याने कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले. त्याऐवजी महिला आणि इतर दोन व्यक्तीचे रक्त नमूने तपासणी करण्यासाठी पाठवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


नेमकं काय घडलं?


कल्याणीनगर  (Kalyani Nagar accident Update) येथे १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला १५ तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.


पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी


कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात  (Kalyani Nagar accident Update) प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे.