पुणे : राष्ट्रवादीचे आतापर्यंत तटस्थ असलेल्या आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांची भूमिका अखेर ठरली. आपली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) असून यापुढेही जुन्नरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा कायम फडकत ठेऊ असं अतुल बेनके यांनी जाहीर केलं आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचाही उमेदवार जवळपास ठरला आहे. पवारसाहेबांनी जर उमेदवारी दिली तर आपण विधानसभा निवडणूक लढू अशी भूमिका काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांनी घेतली आहे. त्यांनी विधानसभेची तयारीही सुरू केल्याचं चित्र आहे. 


पुण्यातील जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आतापर्यंत तटस्थ होते. ते शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात वावरत होते, त्यामुळे अतुल बेनके हे नेमके कोणत्या गटात आहेत हे स्पष्ट होत नव्हतं. विशेष म्हणजे अतुल बेनके यांची शरद पवार आणि अजित पवारांशीही तिककीच जवळीकता असल्यानं त्यांनी दोन्ही नेत्यांसोबत संपर्क कायम ठेवला होता. आता बेनके यांनी आपली भूमिका जाहीर केली असून अजित पवारांची साथ देण्याचं जाहीर केलं आहे. 


काय म्हणाले अतुल बेनके? 


आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांना साथ देण्याची आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, शरद पवारांप्रमाणेच अजित पवारही शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा आहे. दादांच्या नेतृत्वाखाली भविष्यात प्रवास करावा लागणार आहे. अजित पवार हा सच्चा माणूस आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, जनतेच्या हितासाठी मी निर्णय घेतोय. दादा हे आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला मिळालेलं खंबीर नेतृत्व आहे. जुन्नर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायम फडकत राहील असा शब्द देतो.


अतुल बेनकेंना शरद पवारांनी पर्याय शोधला


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुन्नर मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचं दिसतंय. त्यामुळेच त्यांनी आतापर्यंत तीनदा या तालुक्यात दौरे केलेत. सोबत अतुल बेनके असले तरीही शरद पवारांनी काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला. अतुल बेनकेंनी जर अजित पवार गटात जायचा निर्णय घेतला तर या ठिकाणी आपला उमेदवार सत्यशील शेरकर हेच असतील असे संकेतही त्यांनी दिले होते. 


कोण आहेत सत्यशील शेरकर? (Who Is Satyashil Sherkar)


सत्यशील शेरकर हे काँग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात त्यांची चांगली क्रेझ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळं शरद पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


अतुल बेनकेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर आता या ठिकाणची लढत स्पष्ट झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर हेच एकमेकांविरोधात लढतील अशी दाट शक्यता आहे. अशी जर लढत झालीच तर बेनके आणि शेरकर हे वरवर उमेदवार असतील, खरी लढत तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच असेल हे नक्की. 


ही बातमी वाचा :