जुन्नर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून घेतलेल्या निर्णयांवर 'सवाल पे सवाल' करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार तोफ लागली. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी मग भाजप का चालत नाही? अशी विचारणा करत प्रश्नांची सरबत्ती केली. वरिष्ठांनी निर्णय घेतलेला चालतो आणि कनिष्ठांनी घेतलेला का चालत नाही? असा थेट प्रश्न शरद पवारांना उद्देशून केला.


राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही?


अजित पवार म्हणाले की, 1995 मध्ये मी फक्त आमदार होतो. आघाडीचे सरकार त्यावेळी पडलं. 1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं, अशी भूमिका वरिष्ठांनी घेतली. अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं, परकीय व्यक्तीचं धोरण? आजवर शिवसेना, काँग्रेस आणि भाजपचेही मुख्यमंत्री झाले, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर. आर. आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आलं असतं, मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं मग भाजप सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं? वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत? अशी विचारणा त्यांनी केली. 


नरेंद्र मोदींना पर्याय आहे का?


यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींना पर्याय आहे का? अशी विचारणा सुद्धा केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जो घेतला यावर बोलताना ते म्हणाले की त्यांच्यासमोर कोणी लढायला तयार आहे का? इंडिया आघाडी केली, पण ममता बॅनर्जी आत्ताच म्हणाल्या, मी माझी स्वतंत्र लढणार. का असा त्यांनी निर्णय घेतला कारण पुढे मोदी आहेत असा दावा अजित पवार यांनी केला. 


मराठा आरक्षणावरून अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मी ठामपणे सांगतो. पृथ्वीराज चव्हाण आणि अलीकडे देवेंद्र फडणीस यांनी निर्णय घेतला पण ते आरक्षण टिकलं नाही. माझं म्हणणं आहे की आरक्षण कायमस्वरूपी टिकायला हवं. तशाप्रकारे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मताचा आहे. उगाच माझ्याबद्दल काहीजण अपप्रचार करतात. माझ्या काही क्लिप व्हायरल केल्या जातात. दादा काय येडा आहे की खुळा? हे मला काही कळत नाही. मी आरक्षण मिळण्यासाठीच काम करणार असल्याचे यावेळी पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या