Pune Holi :  होळीच्या सणाला काहीच दिवस (Holi) शिल्लक राहिले आहे. दरवर्षी होळीदिवशी अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे अनेकांना ईजा होते. मात्र यावेळी होळी पेटवताना काळजी घेण्याचं आवाहन अग्निशमनदलाकडून करण्यात आलं आहे. होळीच्या दिवशी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी  जनतेसाठी काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. होळीचा आनंद जपून  साजरा करा, असं देखील आवाहन त्यांनी केलं आहे. पुण्यात होळी मोठ्या उत्साहत साजरी केली जाते. प्रत्येक चौकात होळी पेटवली जाते. त्याचप्रमाणे मोठमोठ्या सोसायट्यांमध्येही लोक एकत्र येऊन होळी पेटवत असतात. नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून अग्निशमन दलाने या सुचना जारी केल्या आहेत. 


होळीच्या वेळी कोणती दक्षता घ्यावी?


- होळी पेटवताना होळीमध्ये मोठ्या प्रमाणावर जळाऊ पदार्थ अर्पण न करता लहान स्वरूपातील होळी पेटवावी.
- होळी पेटविताना ती मोकळ्या पटांगणावरच पेटवावी.
- झोपडपट्या या आगीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने झोपडपट्टीच्या परिसरात नाममात्र होळीचे पूजन करत असताना दक्षता घ्यावी.
- लहान मुलांना होळीच्या जवळ जाऊ देऊ नये.
- खबरदारीची उपाययोजना म्हणून होळी पेटविण्यापूर्वी होळीच्या जवळ पाण्याने भरलेले लोखंडी पिंप आणि पाणी फेकण्यासाठी बादल्या उपलब्ध ठेवाव्यात.
- छप्पर असलेल्या जागेत, विजेच्या ताराखाली होळी न पेटवता मोकळ्या पटांगणात पेटवावी. 
- होळीजोपर्यंत पेटत आहे, तोपर्यंत लहान मुलांसमवेत प्रौढ व्यक्तींनी होळीजवळ सोबत राहावे. 
- होळीमध्ये फटाके टाकू नयेत.
- आगीचा प्रादूर्भाव झाल्यास आगीवर पाणी मारण्याकरीता पाण्याचा साठा त्वरित उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने 200 लिटर्सचे पाण्याचे भरलेले पिंप व पाणी फेकण्याकरता बादली ठेवण्यात यावी. 
- ज्या इमारतीमध्ये एल पी जी रेटिक्युलेटेड सिस्टीम आहे, अशा इमारतीमध्ये एल पी जी सिलेंडर बँकेपासून दूर अंतरावर होळी पेटवावी आणि अशा वेळेस सदर बँकेचा केअर टेकर हजर असणे आवश्यक आहे.


- वखारीच्या आवारात अथवा लगत होळी पेटवू नये.


- होळीचे पूर्वी दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस वखारीतील रखवालदार किंवा मजुरांना रात्रीचे वेळी जागता पहारा देण्यास सांगावे.


- आगीचा प्रादूर्भाव झाल्यास, तेथील मजुरांना आगीवर पाणी मारण्याकरिता त्वरित पाण्याचा साठा उपलब्ध राहण्याचे दृष्टीने 200 लिटर्सचे पाण्याचे भरलेले पिंप वखारीमध्ये ठेवावेत. तसेच वखारीचे आवारात वाळूने भरलेल्या बादल्या ठेवण्यात याव्यात.


- बहुतांशी वखारीचे बाहेर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त लाकूडसाठा केलेला असतो, अशा लाकूड साठ्यामुळे आग एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पसरण्याचा धोका असतो. याकरिता अशाप्रकारे रस्त्यावर लाकूडसाठा राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.