Pune Crime : पुण्यातील एका कराटे (Pune crime) शिक्षकाला विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करणं चांगलंच महागात पडलं आहे. शिक्षकाला थेट 10 वर्षांची शिक्षा आणि 17 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आसिफ रफिक नदाफ (वय 31 वर्षे) याने मुलीला अतिरिक्त प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळले. या अत्याचाराबाबत कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी शिक्षकाने दिली होती. 


ही घटना 2018 मध्ये घडली आणि कोंढवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. नदाफवर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (POCSO) कायद्यांतर्गत आरोप करण्यात आले होते. मुलगी गरोदर राहिल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांना अत्याचाराची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ज्यामुळे नदाफला अटक केली आणि खटला चालवण्यात आला. मुलीने तिच्या पालकांमध्ये सुरु असलेल्या भांडणामुळे अत्याचाराबद्दल कोणालाच माहिती दिली नाही. न्यायालयाने असेही नमूद केलं आहे. अत्याचाराच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 


शिक्षकच हैवान?


काही दिवसांपूर्वी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली होती. शिक्षकाने विद्यार्थिनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. पुण्यातील चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली होती. शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत. पुण्यातील अनेक शाळांमधून अशा घटना समोर येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. शिवाय शाळेत गुड टच बॅड टच वर्गाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यातही अनेक मुली अत्याचाराबाबत बोलू लागल्या आहेत.


लैंगिक शोषणात वाढ


पुण्यात मागील काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनेत प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. फक्त शाळकरी मुलीच नाही तर महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात शारीरिक छळ केला जात आहे. अशा अनेक घटना रोज घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या मनातही धास्ती निर्माण झाली आहे. पैशाचं किंवा नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केले जात आहे. शिवाय त्यांचे अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे महिला हा छळ सहन करताना दिसत आहे तर काही महिला या विरुद्ध आवाज उठवताना दिसत आहेत.