पुणे : पुणे शहरात आणि जिल्ह्यात काल (गुरूवारी) पावसाचा (Pune Rain) हाहाकार दिसून आला. तर खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात आला पाणी नदीपात्रातून बाहेर आलं या नदीच्या पाण्यासोबत आपली अंडाभूर्जीचा स्टॉल वाहून जाऊ नये यासाठी तिघेजण झेड ब्रिज परिसरात गेले असता विजेचा शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


आपली अंडाभूर्जीची गाडी वाचवण्यासाठी गेलेल्या तीन जणांना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातलाच एक असलेल्या आकाश माने (Akash Mane) याची अंडाभूर्जीची गाडी होती. रात्री साडेतीन वाचता पाणी आल्याचं कळलं आणि आकाश दोन मित्रांना घेऊन गाडी वाचवण्यासाठी पाण्याच्या दिशेने पळत सुटला. मात्र विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आकाश लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. 


लहानपणीपासून त्याचा सांभाळ त्याच्या काका काकूंनी केला. मात्र आकाशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याचे काका आता हतबल झाले आहेत. आकाशच्या घरातही पाणी शिरलं आहे. आकाशच्या काकाच्या घरातून त्यांचा संसारही वाहून गेलाय पण त्यासोबतच घरातला तरूण मुलगाही पुरानं हिरावून घेतलाय. संसार पुन्हा उभा होईल पण हाताशी आलेल्या आकाश परत येणार नाही अशी परिस्थिती त्याच्या कुटुंबाची झाली आहे.
 
नेमकं काय घडलं?



पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भिडे ब्रिज (Bhide Bridge) परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉट वाहून जाऊ नये, भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता तीन जण गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत. 


प्रशासनाचा ढिसाळ कारभार



याबाबत नागरिकांनी काल (गुरूवारी) एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस (Heavy Rain) सुरु असून देखील त्या परिसरातील लाईट सुरु होत्या. प्रशासनाने तेथील लाईट बंद करणे अपेक्षित होते. रात्रीतून कधीच पाण्याचा विसर्ग केला जात नाही. सकाळी विसर्ग केला जातो. परिसरातील तीन मुले आपला स्टॉल वाहून जाईल या भीतीपोटी स्टॉल वाचवण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरु आहे, असे त्यांनी म्हटले आहे.