पुणे : पुणेकरांना दोन दिवस झालेल्या पावसामुळे (Heavy Rain) मोठा फटका बसला. काल अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. अनेकांचे संसार पाण्यासोबत वाहून गेले आहेत. तर आज पुण्यात पावसाने विश्रांती (Pune Rain Update)  घेतली आहे. दरम्यान खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam)  विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झाला होता. दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं आहे. मात्र या पुरामुळे पुणेकरांचं प्रचंड नुकसान झालं. पुण्यात (Pune Rain Update) ज्या भागात काल पाणी साचून नुकसान झाले त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आढावा घेतला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी  जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून काल निर्माण झालेल्या पुरस्थितीची पूर्ण माहिती घेतली आहे. ज्या एकता नगर, पाटील इस्टेट, सिंहगड रोड परिसरातील बाधित वस्तीत असलेला चिखल आणि कचरा ताबडतोब हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. कामगार कमी असतील तर आउट सोर्स करून कामगार आणा. मात्र, तातडीने तो चिखल साफ करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तर चिखल साफ झालाच पाहिजे अशी तंबी देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 


पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, पुलाची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.


पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. 


घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.


मुरलीधर मोहोळांनी मान्य केली यंत्रणांची चूक


खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) अचानकपणे विसर्ग वाढवण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील पाणी वाढलं त्याचा फटका अनेक सोसायट्या, घरे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. पाण्याचा विसर्ग वाढवल्याची पुर्वकल्पना दिली गेली नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार होता तर त्याची पुर्वकल्पना देणं फार महत्त्वाचं होतं. हा समन्वयाचा अभाव आहे. निश्चितच आम्ही त्याच्या खोलापर्यंत जाणार आहोत. यामध्ये कोणाची चूक असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असंही ते पुढे म्हणालेत.


खडकवासला धरणातून विसर्ग कमी


खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.