German Bakery Blast: 13 फेब्रुवारी 2010 हा दिवस पुणेकर कधीही विसरु शकणार नाहीत. या दिवशी  दिलेल्या जखमा आजही पुणेकरांसह देशवासियांच्या मनात घर करुन आहेत. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील नामवंत बेकरीत नेहमीप्रमाणे ग्राहकांची गर्दी होती. कॉलेज मधील तरुण, तरुणींचे ग्रुप, विदेशी पर्यटक आणि फिरायला बाहेर पडलेले पुणेकर असं जगबजलेलं वातावरणं होतं. सगळं रोजच्या सारखं सुरु होतं. काही क्षणातच सगळं चित्र बदलेल असं कोणालाही वाटलंच नव्हतं. तेवढ्यातच एका बेवारस पिशवीने घात केला. जर्मन बेकरीत अचानक मोठा स्फोट झाला.या बॉम्ब स्फोटाला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत.


13 वर्षापूर्वी जर्मन बेकरी परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास आरडाओरड सुरु झाली. किंकाळ्या उठल्या. लोक सैरावैरा धावत सुटले होते. हसत खेळत असणाऱ्या लोकांचा जोरात आरडाओरड सुरु झाली. या बेकरीत माणसांचे मृतदेह सगळीकडे विखुरले होते.  काहींचा  जीव वाचला मात्र काहींची शरीरं अंगभर जखमांनी भरली होती. हे दृश्य  भीतीदायक होतं. सुरुवातील साध्या सिलेंडरचा स्फोट झाला असं अनेकांना वाटलं मात्र हा साधासुधा स्फोट नसून तो दहशतवाद्यांनी घडवलेला शक्तीशाली स्फोट होता. हे सगळं पाहून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते स्वत:हून पूढे येत जमेल तशी मदत करत होते आणि बचावकार्य राबवत होते. त्यावेळी जे लोक तिथे उपस्थित होते त्यांच्या डोळ्यासमोर हे दृष्य आजही ताजं असेल आणि त्या दृष्यानं त्यांच्या अंगावर आजही शहारे उठत असतील. अनेकांचे हात तुटले होते अनेकांचे पाय तुटले होते. 


या बॉम्बस्फोटात 17 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. त्यात पाच विदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यातले दोघे पुण्यातले होते. 56 नागरिक या स्फोटात जखमी झाले होते. या जखमींमध्ये 10 विदेशी होते. या जखमींना पुण्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यादिवशी या परिसरात आणीबाणीची परिस्थिती होती. पुण्यातल्या जर्मन बेकरीचं नाव एकाच क्षणात वेगळ्याचं कारणाने जगभरात पोहचलं होतं. पुण्यात यापूर्वी दोन किरकोळ स्फोट घडवण्यात आले होते. दहशतवाद्यांना अटकही झाली होती. मात्र त्यात फारसे नुकसान झालं नव्हतं. यानंतर नेहमीप्रमाणे अनेक नेते मंडळींनी घटनास्थळाची पाहणी केली होती.  त्यांनी हादरलेल्या अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. जर्मन बेकरीवर झालेला हल्ला का केवळ एका कॅफेवर झालेला हल्ला नव्हता तर देशावर झालेला हल्ला होता.


कुटुंबियांना धक्क्यातून सावरायला तीन वर्ष लागली...


आज याच हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाली मात्र या हल्ल्याच्या आठवणी अजूनही जर्मन बेकरीच्या मालकांच्या मनातून गेल्या नाही आहेत. या जर्मन बेकरीच्या पार्टनर स्नेहल खरोसे सांगतात की, या बॉम्ब स्फोटाच्या धक्क्यातून  खरोसे कुटुंबीयांना बाहेर पडण्यासाठी सुमारे तीन वर्ष लागली. हे सगळं घडलं तेव्हा मी लहान होते. आम्हाला सात वाजताच्या सुमारास फोन आला. त्यानंतर लगेच आम्ही बेकरीत पोहचलो होतो. ते सगळं पाहून सुरुवातीला मी घाबरलेले. पोलीस माझ्या आईला पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. सगळी पोलीस चौकशी झाली होती. मात्र आता आम्ही सगळे त्या धक्क्यातून नीट बाहेर पडलो आहोत. सगळे नीट कामाला लागलो आहोत. 


बॉम्ब झालेली हीच बेकरी का?


बॉम्ब स्फोट होऊन आता 12 वर्ष झाली आहेत. बेकरी पुन्हा सुरु करताना आम्हाला फार आत्मविश्वास नव्हता. सगळं सुरळीत होईल असं वाटत नव्हतं. मात्र आज सगळं पूर्वीसारखंच आहे. फक्त आता आलेले लोकं एकच विचारतात की, बॉम्ब स्फोट झालेली हिच ती बेकरी का? त्यावेळी आम्हीही सांगतो. होय तुम्ही त्याच बेकरीत बसले आहात म्हणून. आता बेकरी फक्त बेकरी राहिली नाही तर पुण्याच्या इतिहासात बेकरीच्या बॉम्ब स्फोटाचा उल्लेख केला जात आहे. 


जर्मन बेकरीची सुरुवात कशी झाली?


1989 मध्ये पुण्यातील एका मराठी माणसाने जर्मन बेकरी सुरु केली होती. ज्ञानेश्वर नारायण खरोसे असं त्या पुणेकराचं नावं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर हा श्रीमंतांचा परिसर मानला जातो. शिवाय या परिसरात ओशो आश्रम आहे. त्यामुळे या परिसरात अनेक विदेशी नागरीक यायचे. त्याकाळी पुण्यात फार कमी हॉटेल्समध्ये विदेशी पद्धतीचं जेवण किंवा नाश्ता मिळत होता. ज्ञानेश्वर नारायण खरोसे यांचा परकीय चलनाचा व्यावसाय होता. त्यामुळे त्यांचा अनेक विदेशी लोकांशी संबंध यायचा त्या लोकांसाठी खास जर्मनीतला वुडी नावाचा कूक बोलवून ज्ञानेश्वर यांनी ही बेकरी सुरु केली होती. आता पुण्यात कोरेगाव परिसरात आणि लॉ कॉलेज रोडला जर्मन बेकरी आहेत.