पुणे : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणता गणपती (Pune Ganeshotsav 2023) कधी सहभागी होणार यावरुन वाद बघायला मिळाला. मात्र, दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्यावर ठाम आहेत. उद्या चार वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपती मिरणवुकीत सहभागी होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघणार आहे. यंदा श्री  गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे.
 
श्री गणाधीश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघणार आहेत. भगवान शंकरांच्या 8 गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 21 फूट इतकी आहे. रथावर 1 मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहे.
  
मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.


विसर्जन मिरवणुकीत 'दगडूशेठ' गणपती बाप्पा दुपारी 4 च्या दरम्यान सहभागी होणार


मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागीलवर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले.  म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळं अन् ढोल ताशा पथकांसाठी महत्त्वाची माहिती, यंदा अलका टॉकीज चौकात...