पुणे : पैलवान होण्याचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पुण्यातल्या चार तरुणांनी चक्क चोरीचा मार्ग पत्करल्याचं दिसून आलं आहे. अमर कराडकर, भगवान मरगळे, कुलदीप वाल्मिकी आणि निलेश देशमाने अशी या चौघांची नावं आहेत.

कोल्हापुरात जाऊन पैलवान होण्यासाठी हे चौघं शस्त्राचा धाक दाखवून चोऱ्या करत होते. परिसरातील वाढत्या चोऱ्या पाहून कोथरुड पोलिसांनी सापळा रचला आणि या चौघांना अटक केली.

चौघांकडून 120 ग्रॅम सोनं, काही दागिने, तीन दुचाकी, 10 मोबाईल असा एकूण 5 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पैलवान होण्यासाठी या चोऱ्या केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.

आरोपी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. यापूर्वी त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नोंद नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी इतरत्र कोणते गुन्हे केले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.