पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदर काँग्रेसने पुणे मेट्रोचं भूमिपूजन आटोपलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.

दुसरकीडे उद्या भाजप-राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा नारळ वाढवला जाणार आहे.

पुण्यात स्वारगेट येथे काँग्रेसकडून 23 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल, असं पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं होतं. पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला.

आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का?

दरम्यान, भाजपनं पुणे मेट्रोआधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला आहे. शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र महापालिकेनं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरवलं असताना मोदींच्या हस्ते उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

पुणे मेट्रोचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत दिलजमाई केली. या निर्णयावरुन यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे.

भाजप-राष्ट्रवादीचा वाद

पुणे मेट्रो भूमिपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद सध्या निवळला आहे. 24 डिसेंबरला होणाऱ्या मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमिपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमिपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :


पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस


पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा


पवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!