पुणे :  पुण्यात (Pune News)  एफसी रोडवर (FC Road)  असणाऱ्या एका पबमध्ये काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं रविवारी मोठी खळबळ उडाली. या प्रकरणानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन ड्रग्स पेडरलला अटक केली आहे. आतापर्यंत  L3 बारवर झालेल्या कारवाई मध्ये आतापर्यंत 13 लोकांना अटक केली आहे. 


पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात   आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत पुण्यात  ड्रग्स रिटेलची चेन समोर आली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  त्यातील एक नायजेरियन तर  दोन आरोपी पुण्यातील आहे.  तिन्ही आरोपींकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. आरोपीकडून MD आणि कोकेन देखील जप्त करण्यात आले.  अटक केलेल्या एका ड्रग्ज पेडरलरने  L3 हॉटेलच्या पार्टीला ड्रग्स पुरवलं होते.


पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का?


पुण्यातील गजबजलेल्या  एफ सी रोडवरील एल थ्री लाउंज मधील  पार्टीत ड्रग्ज पार्टीने मोठी खळबळ उडाली. हडपसरमधील कल्ट नावाच्या पबमधे त्यांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत पार्टी केली आणि पुढे पहाटेपर्यंत पार्टी करण्यासाठी ते एफ सी रोडवरील एल थ्री लाउंज मध्ये पोहोचले आणि पार्टी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यात कायद्याचं राज्य राहिलंय का? विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला आता ड्रग्जमाफियांनी ताब्यात घेतलंय का? पुण्याला ड्रग्जच्या नशेबाजांचा विळखा पडलाय का? आणि पुण्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्ट औषधाला तरी उरलीय का? असे संतप्त सवाल आता पुणेकर विचारू लागलेयत  पुण्यात सुरू असलेला ड्रग्ज पार्ट्यांचा सुळसुळाट आहे. 


तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर


ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील तरुणाईला पडलेला ड्रग्जचा विळखा समोर आला होता. तर कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघातानंतर पब आणि बारचे दुष्परिणाम समोर आले होते. दोन्हीवेळी कारवाई केल्याचं दिसून आलं . मात्र एफ सी रोडवरील या प्रकरणामुळे या कारवाई किती तकलादू होत्या हे सिद्ध झालंय. ड्रग्जचा विळखा सोडवणं , पब संस्कृतीतून तरुणाईला वाचवणं हे पोलिसांचं काम तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी या मुलांच्या पालकांची आणि शिक्षकांची आहे . त्यामुळं हा फक्त कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न न मानता सामाजिक प्रश्न आहे असं मानून पावलं उचलली गेली तरच आपण या समस्येच्या मुळापर्यंत पोहचू शकणार आहे. 


हे ही वाचा :


Pune Police : अंत पाहू नका, अन्यथा दादागिरी काय असते ते दाखवून देऊ; पुणे पोलीस आयुक्तांचा दम