मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर भागात गतमहिन्यात झालेल्या भीषण पोर्शे कार अपघात प्रकरण आणि पुणे ड्रग्जप्रकरणावरुन आज सभागृहात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याला उडता पंजाब म्हणणं योग्य नाही, असे म्हटले. तसेच, पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केलं. विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन सादर केल्यानंतर विरोधी पक्षांनी 293 च्या प्रस्तावानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे अपघातप्रकरणी पोलिसांच्या दोन चुका झाल्याचंही मान्य केलं.  


विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, आज विरोधकांचा 293 चा प्रस्ताव आहे, ⁠या प्रस्तावामध्ये चंदा लो धंदा दो अशा प्रकारचे वाक्य टाकलं होतं. ⁠मात्र, ते वाक्य का वगळण्यात आलं हे आम्हाला माहीत नाही. ⁠सरकार यावर चर्चा करायला का घाबरते, असा सवाल करत ⁠आमच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. या सभागृहात नियम आहेत, जे काही सभागृहात येणे योग्य नाही ते वगळण्यात आलेलं आहे, ⁠त्यामुळे हे वाक्य मी वगळलेलं आहे, असे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी वडेट्टीवारांच्या प्रश्नावर दिले. 


आमदार सुनिल प्रभू यांची लक्षवेधी


पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडत प्रश्न उपस्थित केले. पुण्यातील हिट अँड रन ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, यातील आरोपीने मद्य प्रशान केलेलं होतं, पण या आरोपीला पोलीस स्टेशनमध्येच बर्गर, पिझ्झा दिला गेला. या आरोपीवरती काय कारवाई केली याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी प्रभू यांनी केली होती. प्रभू यांच्या मागणीवर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. 


गृहमंत्री फडणवीसांचे उत्तर


पुणे पोर्शे कार अपघाताची घटना घडली, तेव्हा या आरोपाला मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुरुवातीला 304 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्याच दिवशी 304 चा गुन्हा दाखल करण्यात आला. ⁠त्या दिवशी जी बाजू मांडली ती माझ्याकडे आहे, याप्रकरणात ⁠पोलिसांनी तात्काळ अपील दाखल केलं. तसेच, आरोपीच्या ⁠रक्ताचा नमुना घेतला, तो ⁠त्याच्या वडिलांशी देखील मॅच करण्यात आला. ⁠मात्र, तो मॅच होत नव्हता. त्यामुळे, पोलिसांनी तपासाअंती डॉक्टरांना अटक केली. ⁠त्यात 3 लाख रुपये एकाने घेतल्याचे कबुल करण्यात आले आहे. आरोपी ⁠पहिल्या आणि दुसऱ्या बारमध्ये बसला होता, त्याचे बिल आणि सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केलं आहे. याशिवाय आरोपीच्या ⁠वडिलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.   


पब्ज आणि ⁠बारच्या मॅनेजरसह इतरांवरही गुन्हा दाखल झाला आहे, चौकशी न करता त्यांनी लिकर सर्व्ह केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली. ⁠त्या आरोपीचे आजोबा यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ⁠ही घटना झाल्यानंतर वरिष्ठांना कळवलं नाही, त्यामुळे संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील 70 पबवरती कारवाई करुन लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे लायसन्स आहेत, त्यांच्याठिकाणी कॅमेरे लावले आहेत. तसेच, बारमध्ये येणाऱ्यांचे वय तपासायलाही सुरुवात झाली आहे. जर वय कमी असताना त्याला दारु सर्व्ह केलं तर लायसन्स रद्द आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही फडणवीसांनी थेट सभागृहातून दिला आहे. 


विजय वडेट्टीवारांचे सवाल


कायद्याचं राज्य राहिलं नाही, पोर्शे कार अपघातातील कारला ⁠6 महिन्यांपासून नंबर प्लेट नव्हती, तरीही कार रोडवर धावत होती. त्यामध्ये काही राजकीय कारण आहे का, ⁠याचा तपास केला पाहिजे. तसेच, ⁠रक्त सँपल बदलण्यात आले होते, ⁠पुण्यात 450 ओपन टेरेस हॉटेल्स आहेत. पोलिसांसाठी 5 लाखांचा हप्ता बांधला गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर, ⁠लहान हॉटेल्ससाठी अडीच लाख रुपयांचा हप्ता आहे. पुण्यात गुंडांची परेड घेतली की ओळख करुन दिली, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.  


पुणे शहारीतील बदलत्या संस्कृतीवरुन संताप


⁠संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना काय तोडपाणी झालं आहे, कोण होत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. तसेच, कायद्याचा धाक राहिलेला नाही, नागपूर येथेही 6 ते 7 घटना झाल्या आहेत, पुण्याचा उडता पंजाब झाला आहे. सांस्कृतिक व सामाजिक म्हणून पुणे शहराचे नाव आहे. इथे बाहेरचे मुले येतात, त्यांच्या पालकांना आता याठिकाणी पाठवायचे की नाही याची चिंता वाटते, असे म्हणत पुण्यातील बिघडलेल्या संस्कृतीवरुन वडेट्टीवारांनी सभागृहात सरकारला जाब विचारला. तसेच, दारुमध्ये महसूल बुडवला ‌जातोय, तुम्ही पुणे पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणार का? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तर, आमदार रोहित पवारांनीही पुण्यातील घटनांवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.


पुणे प्रकरणावरुन रोहित पवारांचाही सवाल


पुणे अपघात आणि ड्रग्ज प्रकरण हाताळताना सिस्टीमेटीक एरर असून सरकारने अँटी ड्रग्ज समन्वय समिती स्थापन केली आहे का?, असा सवाल विचारला. तसेच, ATS ला नोडल एजन्सी म्हणून नेमू असं सांगण्यात आलं होतं, त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे? असेही रोहित पवार यांनी विचारले होते. त्यावरही गृहमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. 



पोलिसांकडून दोन चुका झाल्या - फडणवीस


श्रीमंत-गरिबाला समान न्याय दिला पाहिजे, ससून रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे न्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमं आणि लोकांनी ओरड केली म्हणून कारवाई केली असं नाही. तर, दहा वाजता गुन्हा दाखल केल्याबद्दल जे झालं त्याची संपूर्ण नोंद पोलीस डायरीत आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर मेडिकलला पाठवणे आणि वरिष्ठांना न सांगता गुन्हा दाखल करणे या दोन चुका पोलिसांकडून झाल्या, असे फडणवीसांनी सभागृहात मान्य केले. 


अँटी ड्रग्ज समिती जिल्हानिहाय


दरम्यान, अँटी ड्रग्ज समिती जिल्हानिहाय समिती स्थापन झाल्या आहेत, त्यामध्ये ATS लाही सामावून घेण्यात आलं आहे. यापूर्वी कंटेनरने ड्रग्ज पाठवण्याचा प्रकार समोर आला होता. याला आळा घालण्यासाठी परदेशी कनेक्शन लक्षात घेता केंद्राच्या सूचनेप्रमाणे एटीएसला या कारवाईत जोडलं आहे, अशीही माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.