पुणे: शहरात एका बाजूला स्वाईन फ्लूनं थैमान घातलेलं असतानाच, दुसरीकडे डेंग्यूनंही पाय पसरायला सुरुवात केली आहे.
नुकतंच पुण्यात डॉ. मनिषा सोमुसे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. 32 वर्षांच्या मनिषा होमिओपॅथी डॉक्टर होत्या.
मनिषा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराच्या परिसराची तपासणी केली असता तिथे डेंग्यूच्या अळ्या सापडल्या नाहीत, पण त्या काम करत असलेल्या हडपसरमधील हॉस्पिटलच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. या हॉस्पिटलला पुणे महापालिकेकडून पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात पुण्यात डेंग्यूचे सुमारे सव्वाशे संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून महापालिका क्षेत्रात सध्या डेंग्यूच्या डासांचे ब्रीडिंग स्पॉट शोधून तिथल्या डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचं काम करण्यात येत आहे.
डेंग्यूच्या अळ्या सापडल्याबद्दल जवळजवळ 67 जागांवर महापालिकेनं कारवाई केली आहे.
किती ठिकाणी डेंक्यूच्या अळ्या सापडल्या?
- 8270 खाजगी तर 3071 सार्वजनिक इमारतींमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या
- पैकी पाच हजार जागांवर औषध फवारणी करण्यात आली.
- 67 सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई झाली.
- सुमारे 4000 मिळकतींना नोटीस बजावण्यात आल्या.
- दंडात्मक कारवाईतून 90,566 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.