Pune Crime News: संतापजनक! सोसायटीत कुत्रा घुसल्याने विष पाजून घेतला जीव; पुण्यातील धक्कादायक प्रकार
एका कुत्र्याला मारहाण करून विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: एका कुत्र्याला मारहाण करून विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर खान (२३) यांनी कोंढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षा रक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली. 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुत्र्याचा वेदनांनी रडण्याचा आवाज ऐकला. तो त्वरीत बाल्कनीकडे धावला जिथे त्याला काही लोक लाठी मारताना दिसले होते, असा दावा खान यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
कुत्र्याला सोसायटीच्या मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ते हा प्रकार करत आहेत,असं त्याला सांगण्यात आले. कुत्र्याला मारहाण करु नका असं खान आणि त्याच्या आईने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र चौैघंही यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर खान आणि त्याच्या आईने या घृणास्पद कृत्याची नोंद केली आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी संपर्क साधला. थोड्याच वेळात, एक प्राणी मित्र दाखल झाला आणि परिस्थिती पाहिली. त्यावेळी कुत्राचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा सोसायटीत घुसल्याने या चार जणांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांनी ठरवून कुत्र्याला विष पाजले आणि त्याला मारहाण केली. तक्रारदार ज्यावेळी चार जणांना समजावण्यासाठी आला. त्यावेळी त्यांंनी तक्रारदार आणि त्याच्या आईला सुनावले आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर हे कृत्य पाहून तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असं कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील म्हणाले.
भटके कुत्रे आणि मांजरांचा शहरात धुमाकूळ सुरु आहे. अनेक ठिकाणाहून पालिकेकडे तशा तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. पालिकेच्या नियोजनानुसार कारवाई केली. मात्र अनेकदा भटक्या कुत्र्यांना त्रासून नागरिक अशा प्रकारचे गुन्हे करताना दिसत आहे.