पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता (Ladki bahin yojana) जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून हे अर्ज दाखल झआले असून पुणे (Pune) शहरातून 75 हजार 87 अर्ज दाखल झाले आहेत. तर, हवेली तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या आकेडवारीनुसार सोमवार 5 जुलै 2024 पर्यंत, हवेली तालुक्यात 3 लाख 54 हजार 97, पुणे शहर 75 हजार 817, बारामती 68 हजार 622, इंदापूर 63 हजार 486, जुन्नर 59 हजार 31, शिरुर 57 हजार 287, खेड 54 हजार 802, दौंड 52 हजार 34, मावळ 46 हजार 13, आंबेगाव 39 हजार 75, पुरंदर 37 हजार 967, भोर 29 हजार 411, मुळशी 27 हजार 434 आणि वेल्हा 7 हजार 746 असे एकूण 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी 85.57 टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला असून 78.78 टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी महिलांना एकाच वेळी दोन हप्ते दिले जाणार आहेत. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. मात्र जोपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत इतर योजनांना ब्रेक लागल्याची माहिती समोर येते. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अर्ज येत असून पुणे जिल्ह्यात 9 लाख 72 हजार 819 अर्ज आले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2 लाख 28 हजार 474 अर्ज हे ऑफलाईनरित्या प्राप्त झाले होते. त्यातील 1 लाख 89 हजार 902 अर्ज पोर्टलवर भरण्यात आले असून इतर अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रियेत आतापर्यंत 7 लाख 66 हजार 392 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर 795 अर्ज नाकारण्यात आले आहेत. 65 हजार 265 अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येत असून त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे तसेच उर्वरित पात्र महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेसाठी पात्रता
अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी पात्र असेल. वयाची किमान 21 वर्षे पूर्ण व कमाल 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत योजनेसाठी पात्र असेल. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे.
नवीन संकेतस्थळ सुरू
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये.