Pune Pmc News: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. मतदार याद्यांच्या मसुद्यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले असून, त्या सोडविण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या प्रभागनिहाय मतदार यादीवर प्रशासनाला 5 हजार 956 हरकती प्राप्त झाल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची अर्धवट नावे व पत्ते आढळून आले आहेत. या मतदारांच्या याद्यांमध्ये फोटो नसल्याने प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करताना महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. या सर्व हरकतींची जागेवर पडताळणी करण्यात येत असून ही काम सुरूच आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर 16 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही जागेची पाहणी करून हरकतींचा योग्य पद्धतीने निपटारा करण्यासाठी पुरेसा वेळ होता. 21 जुलै रोजी प्रभागांची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
पुणे महानगरपालिकेत एकूण 58 प्रभाग आहेत. त्यात काही नवीन प्रभाग देखील आहेत. त्यामुळे अनेक हरकती येत आहेत. प्रत्येक निवडणुकीत अनेक हरकती येत असतात. त्या हरकतींनुसार अंतिम मतदार यादी तयार केली जाते. यावेळी अनेक नागरिकांची चुकीची माहिती असल्याने त्यांनी तक्रारी केल्या होत्या. एकाच कुटुंबातील नागरिकांच्या घराचा पत्ता दुसरा, नावातही चुका होत्या त्यामुळे या सगळ्या समस्या आणि हरकती सोडवण्यासाठी महापालिकेने मुदत वाढवून दिली आहे. 21 जुलैपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पुणे दौऱ्यात त्यांनी अनेक नगरसेवकांची भेट घेतली त्याचा सत्कारसुद्धा स्वीकारला. त्यामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. कोणता पक्ष बाजी मारेल हे येत्या काळातच कळेल.