Pune News: पुणे (Pune) शहरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा चांगलाच जोर धरला. त्यानंतर पालिका प्रशासन तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आणि दिवसभरात 139 ठिकाणी खड्डे (Potholes) बुजवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या सगळ्या शहरात नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त होते.  शहरातील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेने (पीएमसी) आणखी दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्या आहेत. 020-25501083 सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान नागरिकांनी या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


गेल्या आठ दिवसांपासून शहरात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक चौक, तसेच मुख्य रस्त्यांवर ड्रेनेजची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक मुख्य चौकात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी केलेली कामे खराब झाली आहेत. शहरातील समान पाणी योजना व मलनि:सारण वाहिन्यांची कामे झाल्यानंतर या रस्त्यांचे काम सुरू असतानाही खड्डे नीट दुरुस्त करण्यात आलेले नाहीत, परिणामी अनेक भागात चेंबर्स कोसळले आहेत.


त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेला करता आले नाही. मात्र, गुरुवारी (14 जुलै) पाऊस ओसरताच महापालिकेने सकाळपासूनच रस्त्याचे काम सुरू केले. प्रशासनाने केलेल्या पाहणीत तब्बल 234 खड्डे आढळून आले. आज 139 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. 18 ठिकाणी कोसळलेले चेंबर उचलण्यात आले असून 14 ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या रस्ते विभागाने दिली.


शहरातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरिकांना आता महापालिकेने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधता येईल; 020-25501083 सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान. याशिवाय नागरिक 9049271003 या क्रमांकावर 24 तास तक्रार करू शकतात.त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाच्या रस्ते विभागाने केले आहे.