Pune Crime : काही दिवसांपूर्वी मोक्का मधून सुटून आलेल्या आरोपीने रॅली काढली होती, यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका सुद्धा झाली. यानंतर पुणे पोलिसांनी आता अशा तरुणांचा चांगला समाचार घेण्याचा ठरवला आहे . याच पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकी परिसरात आज पोलिसांनी तीन तरुणांची या परिसरातून धिंड काढली. काही दिवसांपूर्वी खडकी परिसरात काही तरुणांनी धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार केला होता. या तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांना खाकी खमक्या दाखवत यांची त्याच भागातून धिंड काढली.
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केलेल्या तरुणाला पोलिसांनी "प्रसाद" दिलाय. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, एक मनोरुग्ण आज संध्याकाळी 6.30 वाजता मगर पट्टा भागात दगड फेक करत होता. एका वयस्कर व्यक्तीस तो व्यक्ती मारहाण करू लागला. रासकर चौकात विरुद्ध दिशेने वाहने जाऊ नये म्हणून नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस शिपाई पवार यांनी भांडण सोडवण्यास गेले असता त्यावेळी त्या व्यक्तीने पवार यांना मारहाण केली. संबंधित तरुणावर आता येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.
नागपुरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या
नागपूरात चारित्र्याच्या संशयावरून पती सुरज पाटील याने पत्नीची हत्या केली आहे. नागपूरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत तुळजाई नगरमध्ये घरगुती वादातून ही घटना घडली आहे. पतीने पत्नी राखी पाटील हिला छतावरुन धक्का दिला आणि नंतर तिला रुग्णालयात नेलं आणि ती तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याची माहिती डॅाक्टरांना दिली. पण पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घरात रक्ताने डाग दिसले, त्यानंतर पतीची चौकशी केली असता. चारित्र्याच्या संशयावरून हत्येची कबुली त्याने दिलीय. या हत्येच्या प्रकरणात आरोपी पतीला पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या