पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची कागदोपत्री भरती दाखवून त्यांच्या नावाने पगार लाटणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी अनेक शिक्षण संस्था चालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 28 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


यामध्ये पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी रामचंद्र जाधव, शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक मीनाक्षी राऊत, क्रांती शिक्षक संघटनेचे प्रमुख संभाजी शिरसाठ यांच्यासह पुणे जिल्हा परिषद आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे पुणे सत्र न्यायालयाने या 28 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पुणे महापालिका , पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतील शाळांमध्ये असल्याचं आतापर्यंतच्या तपासात दिसून आलय. मात्र अशा प्रकारे शिक्षकांची बनावट भरती राज्यभरात झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 18 शाळांमध्ये मिळुन 113 शिक्षकांची बनावट पद्धतीने भरती करण्यात आल्याच उघड झालय. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांच्यावर चौकशी न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यात आल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण घेण्याची वेळ आली आहे.




  • राज्यातील खाजगी शाळांमध्ये 2012 सालापासून शिक्षक भरती बंद करण्यात आली आहे.

  • मात्र हा घोटाळा करण्यासाठी या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक 2012 च्या आधीपासून काम करत असल्याचं खोटं दाखवण्यात आलं.

  • हे शिक्षक प्रत्यक्षात अस्तित्वात नसताना त्यांच्या नावे पगार घेण्यात आला.

  • काही प्रकरणात बनावट कागदपत्रांचा उपयोग करून विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची बदली अनुदानित शाळांवर करण्यात आली.

  • शिक्षण संस्थांचालकांच्या या बनावटगीरीला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मान्यता देऊन मदत केली.