Pune Crime news : पती वेळ न देत असल्याने वैतागलेल्या 32 वर्षीय महिलेने थेट पती काम करत असलेल्या आयटी कंपनीला बॉम्बची धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे तिने धमकी पाठवण्यासाठी तिच्या पतीच्या ई-मेल खात्याचा वापर केला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला कोंढवा येथील एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. तिचे पती आयटी इंडस्ट्रीत कर्मचारी आहेत. मात्र धमकीच्या ई-मेलमध्ये नमूद केलेल्या कंपनीतील नोकरी पतीने नुकतीच सोडली आहे. आयटी कंपनीत बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या ई-मेलमुळे पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ई-मेलमध्ये संबंधित पतीचा फोन नंबर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वेळ न देणाऱ्या पतीला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी
दरम्यान, तपास सुरु असताना पोलिसांनी ई-मेलचा आयपी अॅड्रेस शोधून काढला आणि तो पतीच्या टॅबलेटवरुन आला असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने ई-मेल पाठवल्याचं मान्य केलं. या जोडप्याने पूर्वी घटस्फोटाचा विचार केला होता परंतु सामंजस्याने त्यांनी त्याविरुद्ध निर्णय घेतला, असं चौकशीतून समोर आलं आहे. आपल्या निष्काळजी पतीला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी दिल्याचे महिलेने कबूल केलं आहे. महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध कलम 506 (2) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती आणि पत्नीचं भांडण होतं
पती आणि पत्नीचं मागील काही दिवसांपासून वाद होता. नोकरीवरुन किंवा इतर गोष्टींंवरुन दोघांमध्ये कायम वाद व्हायचा. याचाच वाद काही दिवसांपूर्वी टोकाला गेला होता. त्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी हा निर्णय मागे घेतला आणि आता ते सोबत राहतात. मात्र त्यांच्यात पती वेळ न देत असल्याने दोघांची भांडणं व्हायची. त्यामुळे पतीने वैतागून पतीला त्रास देण्यासाठी तिने थेट पतीच्या कंपनीला मेल करुन बॉम्बची धमकी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे या कृत्याची चर्चा होत आहे.
कौटुंबिक वादात वाढ...
सध्या सगळीकडे कौटुंबिक वादात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकांना कुटुंबियांना वेळ देता येणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वादाचं प्रमाण वाढलं आहे. याच कारणांमुळे घटस्फोटाचं प्रमाणही वाढलं आहे.
हेही वाचा