Pune Bypoll election : पुण्यातील लोकसभेच्या  पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक कधी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रवादीने या लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. अजित पावारांच्या वक्तव्याने आता लोकसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे ही निवडणूक जास्त रंगतदार होण्याची शक्यता आहे. 


अजित पवार म्हणाले की,  पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे,अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे 


पुणे लोकसभेसाठी तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच EVM देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी भाजपचे दिवंगत खासदार यांची जागा कोण भरुन काढणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात भाजप आणि कॉंग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. मात्र राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना  भावी खासदार अशा शुभेच्छा देणारे पोस्टर्स पुण्यातील चौकात झळकले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांनीदेखील संधी दिल्यास ही जागा चांगल्या तयारीने लढवेन, असं सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आजही त्यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


असं असलं तरीही मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दाव्याने नव्याने चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपविरोधात 40 वर्षांनी विजय खेचून आणला त्यामुळे आता ही जागा महाविकास आघाडीकडून कोणाला दिली जाते, हे पाहणं महत्वाचं आहे. त्यात कॉंग्रेसकडून तीन नावांची चर्चा आहे. अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाचा समावेश आहे.