Pune Crime news : कोयता गॅंगच्या दहशतीने (Pune Crime) विक्रेत्यांना धमकावत असल्याचे प्रकार ताजेच असताना 'आम्ही येथील भाई आहोत', 'आमच्या भाईला शिव्या देतो का' असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी टोळक्याने लाकडी दांडक्याने आणि चाकूने मारहाण केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील या स्वयंघोषित भाईना चाप कधी बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंबेगाव पठार येथे दोन तरुणांनी हवेत कोयते भिरकावीत, वाहनांवर आणि नागरिकांवर कोयते उगारून दहशत निर्माण केल्याची घटना ताजी आहे. याशिवाय जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत विक्रेत्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून धमकावल्याचा प्रकारही नुकताच घडला आहे. त्यानंतर आता नवले पुलाजवळ एका रुग्णवाहिका चालकाला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली तर आमच्या भाईला शिव्या देतो, असं म्हणत 18 वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहे,
पहिल्या घटनेत, तू आमच्या चिक्याभाईला शिव्या का देतो, असं म्हणून चौघांनी एका तरुणाला लाथाबुक्यांनी मारहाण केला आणि चाकूने वार केला. या वेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तळजाई पठारावरील सेल्फी पॉइंट येथे घडली. यामध्ये 18 वर्षीय हर्षद नितीन खिलारे आणि अतिश पाटोळे जखमी झाले. खिलारे याने दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांनी चौघांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत, नवले पुलाजवळील चव्हाण रुग्णालयातील एक अधिकारी आणि एका व्यक्तीचा वाद सुरू होता. त्यावेळी तेथील 34 वर्षीय मयूर दांगट हे त्यांची रुग्णवाहिका घेऊन तेथे थांबले होते. दांगट यांनी त्यांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, वाद घालणाऱ्या व्यक्तीने 'मी पठारावरील भाई आहे. तुला जिवंत सोडणार नाही,' असे म्हणत दांगट यांच्या डोक्यात दांडके मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या अन्य दोन साथीदारांनी दगडाने मारहाण केली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील भाईंना चाप कधी?
पुण्यात कोयता गॅंगनंतर भाईगिरीच्या दहशतीचं प्रमाण वाढत आहे. शुल्लक कारणावरुन मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात किमान दोन परिसरात मारहाणीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पुणे पोलीस यांच्यावर कारवाई कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.